|Thursday, September 19, 2019
You are here: Home » leadingnews » मनूवाद संपविण्यासाठी फुलेंचे विचार पुढे न्यावे लागतील : शरद पवारांचे मत

मनूवाद संपविण्यासाठी फुलेंचे विचार पुढे न्यावे लागतील : शरद पवारांचे मत 

पुणे / प्रतिनिधी :

महात्मा फुले यांनी समाजाला आधुनिकतेचा विचार दिला. आज मात्र प्रतिगामी विचार पुढे आणला जात आहे. मनुवादाचा विचार अजूनही संपलेला नाही. मनूवाद संपवायचा असेल, तर फुले दाम्पत्याचे विचार पुढे न्यावे लागतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या 128 व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ, डॉ. देवीसिंग शेखावत, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार वंदना चव्हाण, रामकुमार शर्मा, परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

याबाबत बोलताना पवार म्हणाले, आजही मनूचे पुतळे उभारण्याचे काम सुरू आहे. याचाच अर्थ मनुवाद अजूनही उच्चपदावर असणाऱयांच्या डोक्यातून जात नाही. प्रतिगामी विचार अजून पुढे येत आहेत. फुले दाम्पत्याच्या विचारांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळेच मनूवाद संपवायचा असेल, तर फुले दाम्पत्याचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. महात्मा फुले यांनी उभे आयुष्य विचारांसाठी घालवले, समाजाला सन्मान दिला. विचाराने काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. वेगळय़ा विचारांचे वारे वाहत असताना समाजाला समता आणि विकासाच्या मार्गावर आणले. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. विरोध असताना सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. शेतकरी पुढे गेल्याशिवाय समाज पुढे जात नाही, हे त्यांनी सांगितले. देशी वाण, दूध उत्पादन यांचा विचार दिला. आज आपण जे काम करत आहोत, त्याचे मूळ दीडशे वर्षांपूर्वी फुले यांनी दिलेल्या विचारात आहे. त्यांचा कृषीविचार आम्हाला कधी समजला नाही. केवळ शेती करून चालणार नाही. शेतीबरोबरच एखादा जोडधंदा असला पाहिजे, असे विचार महात्मा फुले यांनी त्याकाळी मांडले, असेही पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणाल्या, संविधानाची इमारत खिळखिळी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. भारतीय संविधान लोकशाही धर्माची गीता, अस्मिता आणि त्राता आहे. सर्वांना समान अधिकार देणारी ही जीवनगाथा आहे. संविधानाचे रक्षण करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निवडणुका आल्या असताना उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांना अडकवण्याचा केलेला प्रयत्न आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून, त्यांना त्रास देण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.