|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आता राजू शेट्टी कसे निवडून येतात ते बघतेच !

आता राजू शेट्टी कसे निवडून येतात ते बघतेच ! 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

राष्ट्रवादी कॉंगेसने माने गटाला नेहमीच गृहित धरले असल्यामुळे आमच्यावर कायमच अन्याय झालेला आहे. खासदार राजू शेट्टी हे निवडून येणारे उमेदवार आहेत असे पार्टीला वाटत असले तर ते कसे निवडून येतात हे मला बघायचच आहे. असे जाहिर आव्हान माजी खासदार निवेदिता माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील राजकीय शिवधनुष्य उचलणारच असा सुचक इशाराही त्यांनी दिली.

यावेळी निवेदिता माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचा खरमरीत शब्दात समाचार घेतला. कोणीतरी उठतो आणि राष्ट्रवादीकडे खासदारकीसाठी मदत मागतो. ज्या ठिकाणी मऊ लागेल त्या ठिकाणी उकरायची त्यांची प्रवृत्तीच आहे. आयत्या पिठावर रांगोळी काढणाऱयांना कोणताही संघर्ष करण्याची गरज नसते. ते केवळ लोकांच्या भावनेचे मार्केटींग करत असतात. ते दिखावा करतात व मिडीयाला सामोरे जावून केवळ तेथे शोबाजी करत असतात. आम्ही भावना, गरीबी अथवा केलेल्या कामाचे मार्केटींग कधीही केले नाही. अथवा चालून पायाला फोड उठल्याचेही कधी मार्केटींग केलेले नाही. पण या मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी प्रत्येक गोष्टीचे मार्केटींग करून जो ढोंगीपणा चालवला आहे तो मोडून काढावयाचा आहे असेही माजी खासदार निवेदिता माने यांनी सांगितले.

लोकसभेमध्ये शेतकऱयांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने मांडले होते. रानाच्या मशागतीवेळी एका बाजूला बैल व दुसऱया बाजुला शेतकऱयाच्या पत्नीला जुंपल्याचे चित्र लोकसभेत दाखवून शेतकऱयांची अवस्था दाखवली होती. यंत्रमागधारकांचा प्रश्नही मोठया जिव्हाळयाचा आहे. वस्त्राsद्योग मंत्र्यांनी वीज बिलात सवलत व कर्जावारील व्याजावर अनुदान देण्यासंदर्भात कांही महिन्यांपुर्वी आश्वासन दिले होते. पण याची पुर्तता अजुनही झालेली नाही. या वस्त्राsद्योगामध्ये जे कामगार आहेत. ते आजूबाजूच्या खेडयातूनच आलेले आहेत. त्यांचे संसार टिकवण्यासाठी इचलकरंजीतील यंत्रमाग सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळे या मोर्चामध्ये आवर्जुन उपस्थित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चामुळे या लोकांच्या वेदना लक्षात आल्या. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरवातीपासूनच माने गटावर अन्याय केला आहे. लाखोंचे लीड घेवून निवेदिता माने निवडून आलेल्या असतानाही खासदार शरद पवार यांच्या आदेशाने थांबायला लागले हे सर्व जनतेला माहित आहे. ही जागा राष्ट्रवादी ची असतानाही त्यावेळी काँग्रेसला देवून कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी माने गटाच्या पुर्नवसनासाठी विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादी पार्टीकडून मिळाले होते. पण तोही शब्द पार्टीने पाळला नाही. पण तरीही कोणतीच नाराजी व्यक्त केली नाही. पण प्रत्येक वेळी जर राष्ट्रवादी माने गटाला गृहितच धरत असेल तर या गटाचे ताकद दाखवावीच लागेल. ही ताकद आपली एकटीची नसून ती खासदार बाळासाहेब माने यांची आहे. त्यांना मानणारा जो गट आहे त्या गटाची ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.