|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सव

गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सव 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पत्रकार संघ व संगीत महोत्सव समिती आयोजित 30 वा स्वर सम्राज्ञी गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सव शनिवार 1 व रविवार 2 डिसें. रोजी फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे. कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने होणाऱया या दिवसांच्या संगीत महोत्सवात  गोमंतकीय उदयोन्मुख कलाकार तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलावंत गायन वादन सादर करणार आहेत.

आयोजन समितीचे अध्यक्ष नारायण नावती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयोजन समितीचे जयंत मिरिंगकर, सौ. दीपा मिरिंगकर, धर्मानंद गोलतकर व पत्रकार संघाचे अध्यक्ष गोकुळदास मुळवी हे उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन सायं. 5.30 वा. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी बांदोडय़ाचे सरपंच अजय नाईक व इतर मान्यवर उपस्थित असतील. तत्पूर्वी सायं. 5 वा. गुरुदास नागेशकर व साथी कलाकारांचे सनई वादन व कु. इशा घाटे या इशस्तवन सादर करतील. त्यांना संवादिनीवर दामोदर च्यारी व तबल्यावर ग्रजेश तारी साथसंगत करणार आहेत.

उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ज्येष्ठ कलाकार पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांना लक्ष्मीकांत घाटे प्रतिष्ठानचा स्व. लक्ष्मीकांत घाटे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रघुनाथ फडके पुरस्कृत पं. जितेंद अभिषेकी स्मृती पुरस्कार रजनी ठाकूर यांना प्रदान करण्यात येईल. तसेच कलाप्रेमी सागर पानवेलकर यांचाही यावेळी सन्मान होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात सायं. 7 वा. पं. जयतीर्थ मेऊंडी (हुबळी) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱया दिवशी रविवार 2 रोजी सकाळी 10 वा. साईश पेंडसे (गोवा) यांचे शास्त्रीय गायन, 11 वा. रुद्राक्ष वझे (गोवा) यांचे तबला एकलवादन, दुपारी 12 वा. शाश्वती मंडल (दिल्ली)यांचे शास्त्रीय गायन तर सायंकाळच्या सत्रात 5 वा. रघुनाथ फडके (मुंबई) यांचे शास्त्रीय संगीताची मैफल होईल. सायं. 6 वा. पं. रामदास पळसुले (पुणे) यांचे तबला एकलवादन व शेवटच्या सत्रात 7.30 वा. ‘नाटय़संगीत रजनी’ हा नाटय़गीतांचा कार्यक्रम होईल. त्यात संपदा घैसास (गोवा), मुग्धा भट सामंत व धनंजय म्हसकर (मुंबई) या कलाकारांचा सहभाग असेल. कलाकारांना विठ्ठल खांडोळकर, दत्तराज सुर्लकर, महेश धामस्कर, दत्तराज म्हाळशी हे संवादिनीवर तर उल्हास वेलिंगकर, ऋषिकेश फडके, तुळशीदास नावेलकर, मयांक बेडेकर व जयंत फडके हे कलाकार तबल्यावर साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन दुर्गाकुमार नावती, सौ. दिपा मिरिंगकर, सौ. शकुंतला भरणे, धर्मानंद गोलतकर, नरेंद्र तारी, गिरीश वेळगेकर व चिन्मय घैसास हे करणार आहे.

Related posts: