|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांचा आज संसदेवर धडक मोर्चा

शेतकऱयांचा आज संसदेवर धडक मोर्चा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकरी काल राजधानीतील रामलीला मैदानात डेरेदाखल झाले आहे. या शेतकऱयांचा आज संसदेवर धडक मोर्चा निघणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कालपासूनच रामलीला मैदानावर जमा होत आहेत. देशाच्या कानाकोपऱयातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहे आहेत. हा मोर्चा शुक्रवारी संसदेवर धडकणार असून या पार्श्वभूमीवर संसदेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱयांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱयांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे.शेतकऱयांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठय़ संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱयांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱयांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे.