|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » leadingnews » भीमा कोरेगाव अन् मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

भीमा कोरेगाव अन् मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे ; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली. मात्र पोलिसांवरील हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे मागे न घेण्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल 543 गुह्यांपैकी गंभीर 46 गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भिमा- कोरेगाव दुर्घटनेच्या अनुषंगाने दाखल 655 गुह्यांपैकी 63 गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

मराठा आंदोलनादरम्यान राज्यभरात 543 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 66 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया (ए- फायनल) अंतिम टप्प्यात आहे. चार्जशीट दाखल केलेल्या 117 गुह्यांच्या प्रकरणात ते मागे घेण्यासंदर्भात (ए-फायनल) कोर्टाकडे शिफारस पाठविल्या आहेत. तपास सुरु असलेल्या 314 प्रकरणात चार्जशीट दाखल करुन ते परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून तेही ‘ए-फायनल’ होतील. मात्र, 46 प्रकरणांमध्ये पोलीसांवरील हल्ले आदी बाबतचे सीसीटीव्ही चित्रिकरण आदी सबळ पुरावे उपलब्ध असल्याने ते परत घेतले जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, भीमा- कोरेगाव दुर्घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने 655 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 159 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. 275 मध्ये चार्जशीट दाखल झाले होते. ती 275 प्रकरणे मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 158 प्रकरणे तपासांतर्गत असून त्यातही चार्जशीट दाखल करुन मागे घेण्याची कार्यवाही होईल. 63 गुह्यांमध्ये पोलीसांवरील हल्ले व इतर अनुषंगाने सबळ पुरावे उपलब्ध असल्याने ते मागे घेतले जाऊ शकत नाहीत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना राज्य शासन करीत आहे. अशा कुटुंबांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी संनियंत्रणाची व्यवस्था निर्माण केली आहे. धनगर आरक्षणाबाबत राज्य शासन योग्य पद्धतीने कार्यवाही करत आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल. केलेल्या कार्यवाहीचा कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल. धर्मावर आधारित आरक्षण देण्याची तरतूद नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मुस्लीम धर्मात प्रवेश केलेल्या येथील लोकांनी जाती सोडलेल्या नाहीत. अशा मुस्लीम धर्मांतर्गत मागास जातींची आरक्षणाची मागणी पुढे आल्यास त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला अभ्यास करण्याबाबत कळविण्यात येईल तसेच आयोगाकडून येणाऱया अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.