|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दैवज्ञांची एकजूट समाजाला प्रगतीपथावर नेईल

दैवज्ञांची एकजूट समाजाला प्रगतीपथावर नेईल 

प्रतिनिधी/ सातारा

दैवज्ञ समाजातील असंख्य ज्ञातीबांधवांनी देशाच्या व समाजाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. विविध क्षेत्रात आपल्यातील कलागुण व बुध्दीमत्तेने दैवज्ञ समाज शांततेच्या मार्गाने समाजाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होत असतो. हा समाज विखुरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना एकत्र करण्याचे काम अ. भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने केले आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी अधिवेशनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवलेली एकजूट दैवज्ञ समाजाला प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास समाजश्रेष्ठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर यांनी व्यक्त केला.

येथील श्री काळंबादेवी देवज्ञ ज्ञाती फंड संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या 20 अधिवेशनाचे उद्घाटन शाहू कला मंदिरात झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन दिनकर बायकेरीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष व परिषदेचे विश्वस्त प्रमोद बेनकर, खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सातारा पालिकेचे आरोग्य समिती सभापती यशोधन नारकर, सांगलीच्या नगरसेविका उर्मिला बेलवलकर, प्रख्यात हृदयरोग तज्ञ परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सुरेंद्र शंकरशेट, उदयराव गडकरी, दैवज्ञ संदेशचे संपादक रविंद्र गावणकर, नंदकुमार राजपूरकर, उद्योजिका जयश्रीताई पेडणेकर, महेश वैद्य, सी. ए. अरुण देवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर अधिवेशनासाठी उभारण्यात आलेल्या स्व. मंगला व स्व. मनोहर देवळेकर नगरी, सभागृह प्रवेशद्वार व विविध दालनांची उद्घाटने करण्यात आली. अधिवेशन व 9 व्या दैवज्ञ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशभरातून विविध राज्यातील समाजबांधव व भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना दिनकर बायकेरीकर म्हणाले, दैवज्ञ समाजोन्नती परिषद ही आपली सर्वांची मातृसंस्था आहे. या संस्थेचे साताऱयात होत असलेले अधिवेशनही ऐतिहासिकच ठरले असून सातारकरांनी यजमान म्हणून स्वीकारलेली जबाबदारी अत्यंत चांगले नियोजन करुन पार पाडली आहे. अधिवेशन व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होवून ते दैवज्ञ समाजातील बांधवांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. आजमितीस सुवर्ण व्यवसाय कोसळत चालल्याची भावना आपल्या निर्माण झाली आहे. सुवर्ण व्यवसायात मोठे भांडवलदार उतरणार याची जाणीव असताना देखील आपण बेसावध राहिलो.

युवकांचे समाजाच्या जडणघडणीत योगदान

मात्र, त्याचा फार मोठा फरक सुवर्ण कारागिरीवर पडणार नाही. त्यासाठी व्यवसायातील नवनवीन बदल स्वीकारुन त्यावर मार्ग काढण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यावे लागणार असल्याचे बायकेरीकर यांनी सांगितले. दैवज्ञ समाजातील युवक, युवतींनी आता समाजाच्या जडणघडणीत योगदान दिले पाहिजे. मी दैवज्ञ समाजाचा तरुण नागरिक या नात्याने ज्ञान, तंत्रज्ञान, देशप्रेम ही उद्दिष्टये नजरेसमोर ठेवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे, अशीही अपेक्षा बायकेरीकर यांनी व्यक्त केली.

प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी आपल्या भाषणात दैवज्ञ समाज बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. यावेळी तर प्रख्यात जगन्नाथ पेडणेकर, सी. ए. अरुण देवळेकर, स्वागताध्यक्ष प्रमोद बेनकर यांची भाषणे झाली. यावेळी अधिवेशन व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. रविंद्र माहिमकर यांनी प्रास्ताविक केले. धनंजय भुर्के यांनी स्वागत, चंद्रशेखर दाभोळकर यांनी सूत्रसंचालन, तर सुनील देवरुखकर यांनी आभार मानले. अधिवेशन यशस्वीतेसाठी काळंबादेवी दैवज्ञ ज्ञाती फंडाचे अध्यक्ष प्रमोद बेनकर, उपाध्यक्ष संदीप पावसकर, चिटणीस धनंजय भुर्के, प्रसाद नारकर, संदेश नारकर, अमित भुर्के, विद्याधर साळवणकर, अरुण देवळेकर, अशिष मिर्लेकर, जयप्रकाश भद्रे, वैभव साने, महिला समितीच्या अध्यक्षा सुषमा नारकर, उपाध्यक्षा प्रिया बेनकर, केतकी साळवणकर, स्नेहल भुर्के, रुपाली सरंदकर, योगिता नारकर यांनी परिश्रम घेतले.