|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘संजीवनी’ दिलेल्या मुदतीत सुरू होणार नसल्याचे स्पष्ट

‘संजीवनी’ दिलेल्या मुदतीत सुरू होणार नसल्याचे स्पष्ट 

वार्ताहर/ नेत्रावळी

संजीवनी साखर कारखाना 5 रोजी सुरू होऊ शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच संजीवनीच्या व्यवस्थापनाकडून योग्य माहिती पुरविली जात नाही. त्यामुळे आपण आणखी संकटात सापडल्याचा ऊस उत्पादकांचा दावा आहे. सध्या ऊसकापणीसाठी सुमारे 600 कामगार कर्नाटक व महाराष्ट्रातून शेतकऱयांनी आणले असून 35 ते 40 मजूर पुरविणाऱया ठेकेदारांना शेतकऱयांनी प्रत्येकी लाख-दीड लाख अशा आगावू रकमा दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संजीवनीचे व्यवस्थापन व सरकारच्या या अनागोंदी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रित करणारी उपकरणे न बसविल्याने संजीवनी कारखाना बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कारखाना कधी चालू करणार ही मागणी घेऊन ऊस उत्पादकांनी गेल्या सोमवारी कारखान्याला धडक दिली असता दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी 5 डिसेंबरला कारखाना चालू करण्यात येईल असे सांगितले होते. त्यामुळे ऊस उत्पादकांनी तात्पुरती माघार घेतली होती. पण सध्याचे चित्र पाहता 5 रोजी कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

ठोस उत्तर मिळाले नाही : प्रभुदेसाई

यासंदर्भात अधिक माहिती देताना ऊस उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई म्हणाले की, आपण गुरुवार 29 रोजी कारखान्यात गेलो होतो. सोबत ऊसकापणी मजूर ठेकेदारालाही घेतले होते. यावेळी कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यांची भेट घेऊन कारखाना कधी सुरु करणार असे विचारले. मात्र त्यांनी ठोस असे काहीच सांगितले नाही. त्यांच्या एकूण बोलण्यावरून कारखाना 5 रोजी सुरू होईल असे वाटत नाही.

कारखान्याची चाचणी घेण्यात आली आहे. पण यंत्रात बिघाड असल्याने तो दुरुस्त करावा लागेल. त्यामुळे 8 पर्यंत कारखाना चालू करणे शक्य नाही असे प्रशासकांनी सांगितल्याचे वृत्त आहे. कारखाना चालू केल्यानंतर 60 दिवसांत ऊसाची कापणी करण्याची हमी ऊस उत्पादक संघाने घ्यावी असेही प्रशासकांनी सांगितलेले आहे, अशी माहिती प्रभुदेसाई यांनी दिली.

वास्तविक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात कारखाना चालू करणार असल्याने ऊस उत्पादकांनी कापणीसाठी मजुरांची व्यवस्था करून ठेवली होती. आता कारखाना सुरू होण्याची चिन्हे नसल्याने हे मजूर बसून आहेत. आपण ऊसकापणी मजुरांसाठी साडेतीन लाख रुपये इतकी आगावू रक्कम मजूर कंत्राटदाराला दिल्याचे ऊस उत्पादक फ्रान्सिस मास्कारेन्हस यांनी सांगितले. सध्या संजीवनीचे व्यवस्थापन आपल्याला विश्वासात घेत नसल्याची भावना शेतकऱयांत पसरली आहे. त्यातच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंदीय पातळीवर प्रयत्न करून कारखाना 5 पासून पूर्ववत सुरू होणार असे विधान केल्याचे समोर आल्याने ऊस उत्पादक बुचकळय़ात पडले आहेत.

Related posts: