|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘शक्तिमान’ नरेंद्र मोदींचे प्रादेशिक पक्षांना साकडे

‘शक्तिमान’ नरेंद्र मोदींचे प्रादेशिक पक्षांना साकडे 

मोदींची दुसऱया टर्मची स्वप्ने कितपत पुरी होतील ते काळ दाखवेल. पण सरकारला येता काळ सोपा नाही याची जाणीव राजधानीत लक्षावधी शेतकऱयांनी प्रदर्शन करून गेल्या आठवडय़ात करून दिली. स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त शेतकरी विरोधी असे दूषण मोदी सरकारला विरोधक लावत आहेत. आता साऱया देशाचे लक्ष 11 डिसेंबरकडे लागले आहे.

राजकारणात विरोधकांचे कात्रज करायचे असते. अचानक हल्लाबोल करून गनिमी काव्याने शत्रूचे तीन तेरा कसे वाजवायचे हे बघायचे असते. कसेही करून आपला प्रतिस्पर्धी कमजोर कसा पडेल याची रणनीती आखायची असती. विरोधी कळपात सुरुंग लावायचा असतो. पण गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गजबच केले. गेल्या साडेचार वर्षात ज्या प्रादेशिक पक्षांना त्यांनी अनुल्लेखाने मारले अथवा ज्यांना भ्रष्टाचाराचे आगर म्हणून पेश केले त्याबाबत त्यांनी अक्षरशः टोपीच फिरवली. एवढेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसला कायमचे संपवण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या मदतीची एक प्रकारे याचनाच केली. काँग्रेसचे बारा वाजवण्याच्या कामी भाजपशी सहकार्य करा असे सुचवणे म्हणजे दुसरे तिसरे ते काय? कारण 2014 मध्ये 282 जागा  जिंकल्यावर मोदी म्हणजे ‘सर्वशक्तिमान’ आणि त्यांचे विरोधक म्हणजे ‘पाप्याचे पितर’. कोठे इंद्र आणि कोठे श्यामभट अशा प्रकारचे महिमामंडन त्यांच्या भक्तांनी चालवले होते. काहींची मजल तर जे मोदींबरोबर ते देशभक्त आणि जे त्यांच्याविरोधात ते देशद्रोही असे म्हणण्यापर्यंत गेली होती. अमित शाह यांनी तर भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला असे सांगून ‘मिशन 350’ घोषित केले होते. येत्या निवडणुकीत लोकसभेच्या 543 पैकी 350 जागा पटकावण्याचा विडा त्यांनी उचलला होता. शत प्रतिशत भाजपकडे त्यांना वाटचाल करायची होती. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव असोत वा बंगाल मध्ये ममता बॅनर्जी असोत. त्यात काही वावगे नाही. पण या काँग्रेसला संपवले पाहिजे.. नावालादेखील काँग्रेसला एकही जागा मिळू देऊ नका असे पालुपद मोदींनी या प्रचारात लावले होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की ‘काँग्रेस मुक्त भारताची’ मोहीम परत एकदा सुरू झाली आहे. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून मोदींना फत्ते हासील करायची आहे. त्याचा पहिला भाग म्हणजे काँग्रेसपासून दूर राहा असे प्रादेशिक पक्षांना सांगितले जात आहे. विरोधी पक्षांचे ‘महागठबंधन’ बनण्याच्या प्रक्रियेला सुरुंग लावून काँग्रेसचे कंबरडे मोडण्याची ही खेळी आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी या खेळीचा पहिला भाग खेळला गेला. मध्य प्रदेश असो वा छत्तीसगढ-कोणत्याही राज्यात कोणाही प्रादेशिक पक्षाने काँग्रेसच्या वाऱयाला फिरू नये याची खबरदारी घेतली गेली. असे म्हणतात की एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याच्या भावाची सक्तवसुली संचालनालयातर्फे तपासणी तेरा दिवस चालली होती. त्याबाबत एक शब्द बाहेर आला नाही. त्याचा योग्य तो परिणाम मात्र झालेला दिसला. सोंगटय़ा भाजपच्या मनाप्रमाणे
बसल्या.

 मोदींच्या या खेळीला कितपत यश मिळेल याबाबाबत मात्र शंका आहे. कारण गेली साडेचार वर्षे भाजपा मित्रपक्षाशीदेखील फटकळ राहिलेली आहे. ‘तुम्ही म्हणायला मित्रपक्ष, पण प्रत्यक्षात तुम्ही मांडलिक’ असेच भाजपचे वर्तन राहिले. चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या ज्ये÷ मुख्यमंत्र्याला पंतप्रधान फारसे कधी भेटावयाचे नाहीत. मग इतरांची काय कथा? शिवसेनेचे राज्यात किती हाल केले गेले ते सर्वश्रुत आहेच. आता मात्र ‘आपण सारे भाऊ-भाऊ, गुण्यागोविंदाने राहू’ असे साऱया गैरकाँग्रेसी पक्षांना सांगितले जात आहे. प्रादेशिक पक्षांना घातले गेलेले साकडे म्हणजे लोकसभेचा महासंग्राम सुरू होण्यापूर्वीच अचानक भाजपचे हातपाय गार पडू लागले आहेत की काय अशी शंका यावी. अवघ्या 44 जागा मिळवून मरणासन्न झालेल्या काँग्रेसला केवळ जीवदानच मिळालेले आहे असे नव्हे तर नवजीवन प्राप्त होत आहे.

यात सर्वात जास्त कोणता नेता खूष दिसत आहे असे बघितले तर तो म्हणजे सोनिया गांधी या होत. नायडूंच्या मागोमाग आता बिहारमधील केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह सत्ताधारी आघाडीला रामराम ठोकण्याच्या बेतात आहेत. नवीन कोणी साथीदार भेटेनात आणि जे आहेत तेच राखता येईनात अशी ‘अवघड आणि अशुद्ध’ स्थिती भाजपची झालेली आहे.

प्रबळ प्रतिचढाई

मोदी आणि शाह यांची मात्र एक खासियत आहे. ते शेवटपर्यंत लढत राहतात. ख‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असा काँग्रेस नेत्यांसारखा सोयीस्कर गैरसमज करून घेत नाहीत. राजस्थानमध्ये भाजप हरणार असे तीन महिन्यापूर्वी चित्र होते पण शाह यांनी साऱया पक्षाला कामाला लावून ते चित्र बऱयापैकी पालटले आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या भांडणात भाजपच्या पोळीवर तूप कसे पडेल याकरता रणनीती आखली गेली आहे. ‘भाजप जिंकली तर वसुंधराराजे मुख्यमंत्री होणार नाहीत’ असा संदेश नाराज भाजपाईंना देऊन कामाला लावण्यात आले आहे.

राहुल गांधींचे गोत्र काय, असे मुद्दे काढून भाजप जाणूनबुजून वसुंधराराजे सरकारचे अपयश झाकत आहे असे मानले जाते. निवडणुकीत अशा प्रकारचे विषय निघणे ही भाजपकरता फायद्याची गोष्ट आहे. काँग्रेसची निवडणूक यंत्रणा इतर राज्यांप्रमाणे राजस्थानमध्ये देखील नाही. भाजपला विटलेला मतदार आपल्या पारडय़ात मत टाकेल या भरोशावर काँग्रेसचा डाव सुरू आहे. मोदी-शाह याना उगाचच ‘महाबली’ मानले जात नाही. एकाच वेळेला सरकार, संघटना यावर पकड ठेवून त्यांनी दुसऱया टर्मवर डोळा ठेवलेला आहे. या दुसऱया टर्मची स्वप्ने कितपत पुरी होतील ते काळ दाखवेल.

पण सरकारला येता काळ सोपा नाही याची जाणीव राजधानीत लक्षावधी शेतकऱयांनी प्रदर्शन करून गेल्या आठवडय़ात करून दिली. स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त शेतकरी विरोधी असे दूषण मोदी सरकारला विरोधक लावत आहेत. आता साऱया देशाचे लक्ष 11 डिसेंबरकडे लागले आहे. पाच राज्यांचा कौल हा लोकसभा निवडणूक कशा प्रकारे होणार याची रंगीत तालीम आहे.

सुनील गाताडे