|Monday, June 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्याला नवा साज

‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्याला नवा साज 

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱया आणि प्रतीक्षा लागून राहिलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई 3’ मध्ये दडलेली एकेक रहस्ये आता उलगडू लागली आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे चित्रपटात पिंजरा या 1972 मध्ये आलेल्या अजरामर चित्रपटातील कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी… आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी…गं साजनी हे गाजलेले गीत या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱया पिंजरा चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई 3’ मध्ये सामील करून ते आगळय़ा पद्धतीने चित्रित केले गेले आहे. पिंजरातील या गाण्याच्या चित्रपटातील समावेशामुळे रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्यामुळे अधिकच ताणली जाणार आहे. गं साजणी या गाण्याचे पुनरुत्थान केले गेले असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे असून त्यात विश्वजीत जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱहीदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण साऊंडडिज येथे झाले असून ते किट्टू मायक्कल यांनी केले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग एव्हीजे स्टुडिओजचे आहे. गाण्याच्या संगीत कलाकारांमध्ये सोमू सील (गिटार) आणि कोरस गायकांचा समावेश आहे. नफत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, ख्यातनाम दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे जुळलेले यशस्वी समीकरण पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा ते यशस्वी ठरणार आहे ते ‘मुंबई पुणे मुंबई-3’च्या माध्यमातून. पुढील आठवडय़ात प्रदर्शित होणाऱया या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल पेंकरे आणि विजय पेंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

पहिल्या दोन भागांच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून गौतम आणि गौरी ही स्वप्नील-मुक्ताची जोडी आज घराघरात पोहोचली असून त्यांच्या जीवनात पुढे काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग मुंबई पुणे मुंबई-2 तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावफत्ती झाली. आता चित्रपटाच्या तिसऱया म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई 3’च्या माध्यमातून ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाण्यास सज्ज झाली आहे. चित्रपटातील गाणी देवयानी कर्वे-कोठारी, पल्लवी राजवाडे आणि अश्विनी शेंडे यांनी लिहिली आहेत. तर ती आनंदी जोशी, सई टेंभेकर, वर्षा भावे आणि योगिता गोडबोले यांनी गायली आहेत. चित्रपटाचे संगीत अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर आणि राम कदम यांचे आहे.