|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे – अमित शाह

एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे – अमित शाह 

ऑनलाईन टीम / प्रतापगढ :

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेसवर बरसले आहेत. काँग्रेसनं फक्त जमिनीवरच नव्हे, तर पंचमहाभूतांवरही घोटाळे केले, अशी घणाघाती टीका शहा यांनी केली. काँग्रेस सत्तेत असताना आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळात घोटाळे झाले, असे शहा म्हणाले. ते प्रतापगढमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते.

काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहांनी केला. ’जगात पंचमहाभूतं आहेत. आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळ यांचा पंचमहाभूतांमध्ये समावेश असतो. काँग्रेसनं अवकाशात इस्रो आणि 2जी घोटाळे केले. आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा केला. जमिनीवर आदर्श सोसायटी, समुद्रात पाणबुड्या आणि जमिनीखाली (पाताळात) कोळसा घोटाळा केला,’ अशी टीका शहांनी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ’राहुल बाबा जोरजोरात बोलत होते की, मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसचे सरकार येईल. राहुल बाबा, स्वप्न पाहणे चांगले असते. मात्र दिवसा स्वप्न पाहणे चांगले नसते,’ असा टोला त्यांना लगावला. दहा वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं राजस्थानला काय दिलं, असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. काँग्रेसनं आदिवासी समाजासाठी काहीच केलं नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पहिल्यांदाच आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना केली. मोदी आणि वसुंधरा राजे यांनी आदिवासी समाजाला सशक्त करण्याचे काम केले, असे शहा म्हणाले. राहुल गांधींकडे सध्या ‘मोदी हटाओ’शिवाय कोणताही कार्यक्रम नाही. त्यांना मोदी फोबिया झाला आहे, असा चिमटा त्यांनी काढला.