|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वानंद व आत्मकल्याणासाठी भारतीय सांस्कृती सर्वश्रेष्ठ

स्वानंद व आत्मकल्याणासाठी भारतीय सांस्कृती सर्वश्रेष्ठ 

प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

सर्व मानव जातीने परस्पराशी प्रेमाने वागून बंधूभाव जपला पाहिजे. सत्य, अंहिसा, अचोर्य, परिग्रह व ब्रह्मचार्य या व्रताचे पालन करून विश्वात व राष्ट्राराष्ट्रात समानता, शांतता कशी निर्माण होईल, यावर प्रयत्नशील राहिले पाहिजे. स्वानंद व आत्मकल्याणासाठी भारतीय सांस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक धर्माचे ग्रंथ भिन्न असले तरी तत्वज्ञान, आचरण पद्धती वेगळी असले तरी कर्मफलापासून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे व्यास प्रणित ‘परोपकारात पुण्याय पापाय परपीडनम्’ हा सर्व पुराणाचा, आगमाचा, सुभाषितांचा, श्लोकाचा अर्थ आहे. कर्माला भक्तीची जोड दिली की ते सत्कर्म होते. असे विचार प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांनी मांडले.

जयसिंगपूरमध्ये गीता परिवाराच्यावतीने आयोजित विश्वहर्ता श्री गणेश कथा ज्ञानयज्ञ महोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. समारोपाच्या कार्यक्रमात विविध धर्मातील प्रमुखांनी आपले विचार मांडले. यावेळी पंढरपूरचे पंढरीनाथ थावरे, माधवदास, भानुदास यादव, करवीर पिठाचे शकराचार्य, भट्टारक लक्ष्मीसेन महाराज, कोटनीस महाराज आदींनी कार्यक्रमस्थळी भेट देवून भक्तांना मार्गदर्शन केले. सर्व धर्म गुरूंच्या आगमनानंतर घोडावत कथा नगरीमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले.

येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपामध्ये चार दिवस किशोरजी व्यास यांच्या सुश्राव्य गणेश कथा ऐकण्यासाठी भक्तांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. पहिल्या दिवशी कलश व शोभा यात्रेने जयसिंगपूरमध्ये चैतन्य निर्माण झाले. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्यास यांचे विचार ऐकण्यासाठी शहरातील विविध शाळेतील युवक व युवतींनी उपस्थिती लावली. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या योग क्रिया पाहून किशोरजी व्यास यांनी गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सृजन साधना ही नाटय़ शुभांगीच्या कलाकारानी सादर केलेली नाटीका भावपूर्ण ठरली.

शेवटच्या दिवशी संत पुजन व सत्संगासाठी बाहेर गावातील भक्तांनीही उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता परिवाराच्या प्रमुख प्रमिला माहेश्वरी, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनोद घोडावत, डॉ. सुरेश पाटील, विनिता बियाणी, शामसुंदर मालू, अशोक सारडा, भूपाल गुरव, दादा पाटील-चिंचवाडकर, अर्चना झंवर, स्नेहल कुलकर्णी, मधुसुदन बजाज आदींच्यासह गीता परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रारंभी गीता परिवाराच्या संस्कारातून सिद्ध झालेल्या मुलांनी गुरूस्त्राचे पठण केले. तर पसायदानाने कार्यक्रमाचा समारोह करण्यात आला. हमारी शक्ती इश्वर की भक्ती, भारत माता की जय, या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

सनातन वैदिक धर्म हाच आपला मूळ प्रवाह

सगुनाची कास धरल्याविना र्निगुनाची प्राप्ती होत नाही. हिंदु धर्मात घालून दिलेले सगळे संस्कार विज्ञानाचा आधारे सिद्ध होतात. आपला धर्म हा सनातन वेदिक धर्म आहे. तोच आपले मुळ प्रवाह आहे. आज ठिकठिकाणी संस्काराचे वर्ग चालवले जातात. मात्र खरे संस्कार घरात रोज मिळतात. भागवत हा धर्माचा ग्रंथ आहे. भागवतातील भक्ती ही ज्ञानेश्वरी भक्ती आहे. तर भक्ती हे वेदाच्या वेलीवरचे फुल असल्याचे करवीर पिठाच्या शकराचार्यांनी सांगितले. 

श्री गणेश हा विघ्नहर्ता, बुद्धीदाता

श्री गणेश हा विघ्नहर्ता आणि बुद्धीदाता ही आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी गुरू हा शब्द 138 वेळा आला आहे. संत वचनी, धर्मग्रंथ याचा अभ्यास करून आपण नराचे नारायण व्हायला पाहिजे, असे विचार गुरूनाथ कोटणीस महाराजांनी मांडले.

ग्रंथांचे आचरण झाले पाहिजे

ग्रंथांची नुस्ती पारायणे करून चालणार नाहीत. तर आचरणातही आणावे लागेल. आपण जीवनात सगळे मिळवतो, मात्र सगळ्याना आवश्यक असे संस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे शिवयोगी शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.

शास्त्र समजून घेण्यासाठी साधु-संतांची आवश्यकता

शास्त्राप्रमाणे वागल्यास आपल्याला कधीही अडचण येत नाही. शास्त्र समजून घेण्यासाठी साधु-संताची आवश्यकता असते. संस्कार हेच सोने असल्याने आपण मुलांवर संस्कार करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असे मत भट्टारक लक्ष्मीसेन महाराज यांनी मांडले.

Related posts: