|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदस्यांच्या आक्रमकपणामुळे उपतहसीलदारांची बोबडी वळली

सदस्यांच्या आक्रमकपणामुळे उपतहसीलदारांची बोबडी वळली 

प्रतिनिधी /बेळगाव :

मागील अनेक वर्षांपासून कडोली, काकती आणि इतर भागातील शेतकऱयांच्या उताऱयांवर नो-क्रॉप्सचा उल्लेख आढळून येत आहे. यामुळे अनेकांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वारंवार बैठकीत सांगण्यात आले आहे. मात्र, तहसीलदार कार्यालयातील संबंधितांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत लवकरच निर्णय न घेतल्यास शेतकऱयांसमवेत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी दिला.

उपतहसीलदार माहिती देत असताना त्यांना मध्येच थांबवून आधी शेतकऱयांच्या समस्यांची माहिती घ्या, असे सांगण्यात आले. विहिरी, कूपनलिका खोदण्याची परवानगी घेण्यासाठी शेतकरी गेला असता आधी उताऱयावरील नो-क्रॉप हा उल्लेख काढून आणा, असे सांगण्यात येत आहे. तहसीलदार कार्यालयात हा उल्लेख काढण्यासाठी गेले असता आज या उद्या या असे करून शेतकऱयांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे हा उल्लेख कधी कमी करणार? असा सवाल उपस्थित केला असता उपतहसीलदार शांतच होते. नो-क्रॉप्स हा उल्लेख शेतकऱयांच्या उताऱयांवर असल्यामुळे अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हा उल्लेख तातडीने खोडावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

अनुपस्थित अधिकाऱयांना नोटिसा पाठवा

वारंवार सांगूनदेखील जे अधिकारी अनुपस्थित आहेत त्यांना तातडीने नोटिसा पाठविण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. तहसीलदार मंजुळा नाईक या मागील चार बैठकांना आल्या नसून या बैठकीलाही अनुपस्थित राहिल्या आहेत. त्यामुळे आम्ही समस्या मांडायच्या कोणाकडे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी विविध कारणांनी जे अधिकारी आले नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात याव्यात, असा ठराव करण्यात आला.

Related posts: