|Sunday, February 23, 2020
You are here: Home » क्रिडा » रियल काश्मिर एफसीचा विजय

रियल काश्मिर एफसीचा विजय 

लीग फुटबॉल : ऐजवाल एफसीवर एकमेव गोलने मात

वृत्तसंस्था/ श्रीनगर

आय लीगमध्ये पदार्पण करणाऱया रियल काश्मिर एफसीने शानदार प्रदर्शन पुढे चालू ठेवले असून बुधवारी येथे झालेल्या सामन्यात त्यांनी माजी आय लीग चॅम्पियन ऐजवाल एफसी संघावर एकमेव गोलने विजय मिळविला.

या संघातून खेळणारा आयव्हरीचा मिडफिल्डर बेझी आर्मंडने 30 व्या मिनिटाला  एकमेव विजयी गोल नोंदवला. त्यांचा हा तिसरा विजय असून 6 सामन्यांत 10 गुणांसह त्यांनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऐजवाल एफसी 7 सामन्यांत 5 गुणांसह नववे स्थान कायम राखले आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी एकेक बदल केले होते.

रियल काश्मिरने प्रारंभापासूनच आक्रमक खेळावर भर दिला. पण 25 व्या मिनिटाला ऐजवालला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. अल्बर्टने मारलेल्या क्रॉस फटक्मयाला काश्मिरचा गोलरक्षक बिलालने हाताने स्पर्श करीत बाहेर घालविण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू आडव्या बारला लागून ऐजवालचा स्ट्रायकर अनसुमनाह क्रोमाहकडे गेला. चेंडूपासून थोडासा दूर असला तरी त्याने साईड फ्लिक करीत गोलच्या दिशेने चेंडू मारला. पण तो बारवरून बाहेर गेल्याने त्यांची ही संधी वाया गेली. 30 व्या मिनिटाला मात्र काश्मिर संघाने आघाडी घेतली. सुरचंद्र सिंगने डाव्या बाजूने कॉर्नरवर फटका मारला. बेझीने ऐजवालच्या बचावपटूपेक्षा उंच उडी घेत या चेंडूला हेडरवर गोलजाळय़ाची अचूक दिशा दिली. गोलरक्षक गुरप्रीतला त्यावर बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. बेझीचा हा या स्पर्धेतील दुसरा गोल होता. ऐजवालने अखेरपर्यंत बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण काश्मिर संघाने त्यांना यश मिळू दिले नाही.

Related posts: