|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जंतरमंतरवरील आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

जंतरमंतरवरील आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा 

प्रतिनिधी/ पणजी

दिल्लीत जंतरमंतरवर 11 डिसेंबरपासून सुरु होणाऱया आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय शनिवार काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत व केंद्रीय नेते चेल्लाकुमार यांच्यासह अन्य आमदारही आंदोलनस्थळी उपलब्ध राहाणार आहेत.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत खाण अवलंबितांच्या आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. खाण अवलंबितांना आतापर्यंत काँग्रेस पक्षाने सतत पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस पक्ष खाण अवलंबितांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी खाण अवलंबितांना दिले होते. सुरुवातीपासून काँग्रेसने खाण अवलंबितांना पाठिंबा दिला असून हा पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीत होणाऱया आंदोलनाला पूर्ण समर्थन देण्यासाठी जंतरमंतरवर उपस्थिती लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसचे केंद्रीय नेते चेल्लाकुमार, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत यांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर अन्य आमदारानीही दिल्लीत जंतरमंतरवर उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असेही ठरविण्यात आले.

काँग्रेस पक्षाने तालुकावार चालविलेल्या जनआक्रोश आंदोलनाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक तालुक्यात संबंधित आमदारांनी आयोजन चांगल्या पद्धतीने करावे यावरही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. आमदार, मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱया बैठकांबाबत यावेळी संशय व्यक्त करण्यात आला. जर आमदार, मंत्र्यांसोबत, मुख्यमंत्र्यांच्या बैठका होत असतील तर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याला किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांना भेटण्यासाठी का वेळ देत नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

राहुल गांधींचाही पाठिंबा मिळविणार

खाण अवलंबितांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही काँग्रेस नेते भेट घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांनीही आपला पाठिंबा खाण अवलंबितांना द्यावा यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करणार आहे. यावेळी खाण अवलंबितांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊन केंद्रातील भाजप सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. गोवा काँग्रेसने आपला पूर्ण पाठिंबा या आंदोलनाला व्यक्त केला आहे. त्याचबरोबर केंद्रातील काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा मिळवून भाजपसमोर अडचण निर्माण करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे आमदार तीनही दिवस या आंदोलनाला पाठिंबा द्यायच्या तयारीत आहेत. त्यासाठी सर्वच आमदारांशी चर्चा केली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केंद्रीय नेते चेल्लाकुमार विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गोवा फॉरवर्डही देणार पाठिंबा

खाण अवलंबितांच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षानेही आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष खाण अवलंबितांच्या पाठीशी असल्याचे नेते व मंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर हेही दिल्लीत जाऊन आंदोलनाला पाठिंबा देतील. गोवा फॉरवर्ड सरकारमधील घटक पक्ष असला तरीही या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.

Related posts: