|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चोरी प्रकरणी उद्यमबाग येथील युवकाला अटक

चोरी प्रकरणी उद्यमबाग येथील युवकाला अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

चोरी प्रकरणी वाल्मिकीनगर, उद्यमबाग येथील एका युवकाला अटक करुन त्याच्याजवळुन 2 लाख 93 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एक महिंद्रा पिकअप वाहन, तीन मोटार सायकलींचा समावेश आहे. मारिहाळ पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली आहे.

मारुती उर्फ माऱया उर्फ करीम हुल्ल्याप्पा करिकाळ (वय 30, मुळचा रा. चंदूर, सध्या रा. वाल्मिकीनगर, उद्यमबाग) असे त्याचे नाव आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर, उपनिरीक्षक श्रीमती एस. एस. कंबी, पी. के. परसण्णावर, बी. एस. नायक, बी. बी. कड्डी, ए. एम. जमखंडी, एच. एल. यरगुद्री, एम. आर. सुलदाळ, एस. एस. पाटील, एम. एस. हुगार, एम. एस. हिरेमठ, एस. एस. बिल आदींनी ही कारवाई केली आहे.

रविवारी सकाळी बेळगाव-गोकाक मार्गावरील कबलापूर क्रॉसजवळ मारुती उर्फ माऱया महिंद्रा पिकअपमधून जात होता. त्यावेळी त्याला अडवून पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली. वाहनासंबंधीचे कागदपत्रे हजर करण्यास मारुती असमर्थ ठरला. हे वाहन चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे महेंद्रा पिकअपसह (चेशी क्रमांक-एमएआयझेडए 2एबीए41के42382) त्याला ताब्यात घेण्यात आले.

मारुतीचे साथीदार वांड बश्या उर्फ बसाप्पा हुल्याप्पा करिकाळ, राम हुल्याप्पा करिकाळ (दोघेही रा. चंदूर), हणमंत हट्टी (रा. पंचनट्टी, ता. गोकाक), सागर शंकर धामणेकर (रा. राणी चन्नम्मानगर) हे फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्याजवळून नंबर प्लेट नसलेली तीन हिरोहोंडा स्पेंडर प्लस मोटार सायकली, गणबोरींग मॅटल पावडर, 150 किलो अल्युमिनीयमचे तुकडे, 10 मीटर केबल वायर व एक सिलींडर असे एकूण 2 लाख 93 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.