|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एका मोकळय़ा श्वासासाठी..!’

एका मोकळय़ा श्वासासाठी..!’ 

नमस्कार मॅडम, मी कौमुदी ! नमस्कार, या बसा ना कौमुदी. अगदी नावाप्रमाणे ‘पौर्णिमेच्या चांदण्याचे’ सौंदर्य असते ना तशीच होती. गोरापान वर्ण, उंच-मध्यम बांधा, काळेभोर डोळे, पांढऱया शुभ्र दंतपक्ती, सतेज कांती, लांबसडक केस आणि विलक्षण मोहक हास्य !

हं. बोला कौमुदी, मॅडम, मला हल्ली खूप अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. कधी-कधी स्वतःच्या चांगुलपणाचाच राग येतो. वाटतं खूप लांब निघून जावं… हिमालयात! माझं लग्न होऊन पंधरा वर्षे झाली. मी, माझा नवरा, मुलगा, सासू-सासरे असं कुटुंब. नवरा इंजिनिअर आहे. तो जॉब करतो. माझं ब्युटीपार्लर आहे. आजपर्यंत मी कधीच कुणाला तक्रारीची संधी दिली नाही. कौटुंबिक जबाबदाऱया, दैनंदिन सर्व कामे व्यवस्थित आवरूनच घराबाहेर पडते. ‘तुमचा संसार आहे, तुम्हीच सारं करायला हवं’ हा सासुबाईंचा स्वर असल्याने त्यांच्याकडून कधी मदतीची अपेक्षा केलीच नाही. तक्रारही केली नाही. मी सासरी आल्यापासून त्यांना पूर्ण निवांतपणा आहे. त्यांचा स्वभाव तसा ‘मुडी आणि मानी’. समोरच्या व्यक्तीने हाक मारल्याखेरीज या बोलणार नाहीत. पन्नास कामं केली आणि गडबडीत एखादं काम राहिलं तरी ‘हुप्प’ होणार. तरीही मी जाऊ दे म्हणत सोडून देत त्यांना मोठेपणा देवून त्यांच्या कलाने वागत आले. काही दुखलं-खुपलं, आजारपण सारं विनातक्रार आणि मायेने करण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु परवा जे झालं त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. बरं, काय झालं नेमकं? सासुबाईंच्या माहेरचे सगळे त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भातील चर्चेसाठी आमच्या घरी आले होते. चर्चा सुरू होती. त्यामुळे सासुबाईंच्या पूर्वपरवानगीनेच मी चहा देण्यासाठी आत गेले. त्यांची बहीण तावातावाने बोलत होती. मी निमूटपणे चहा दिला आणि बाहेर जाण्यासाठी म्हणून वळले फक्त, तोच त्या म्हणाल्या, ‘माले, बाहेरून आलेल्या मुलीसमोर चर्चा नको. आपल्या गोष्टी आपल्यातच राहिलेल्या बऱया. शेवटी बाहेरूनच आलेली आहे ती !’

मॅडम, यापूर्वीही कशा ना कशा संदर्भात त्यांनी हे वाक्य उच्चारलंय, पण मी दुर्लक्ष केलं. यावेळी मात्र मला ते खूपच लागलं. कोणतीही मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, त्या घराला कुटुंबाला आपलं मानून साऱया जाबाबदाऱया, नाती सांभाळते आणि इतकं करूनही ‘ती’ शेवटी ती बाहेरूनच आलेली राहते का हो? आजच्या काळात कुणी कुणाला विचारत नाही अशीही अनेक उदाहरणं आपण पाहतो परंतु मी असं कधीच वागले नाही. सासरी आल्यास प्रत्येकाची गरज ओळखून, प्रत्येकाजवळ, स्वतःला ‘मोल्ड’ करत जुळवून घेत आले. नवऱयाचं रुटिन, मुलाची शाळा, क्लासेस, सासु-सासऱयांचं रुटिन, आजारपणं, नातेवाईकांची ये-जा, सगळय़ा प्रापंचिक जबाबदाऱया न कुरकुरता निभावल्या, तरीही हेच ऐकायचं का? त्यांना आजही परकी वाटावी मी? मीच सगळय़ांचा विचार करायचा. सगळे आपापल्या परीनं स्वतःसाठीच वेळ काढतात. रिलॅक्स होतात. पण माझी दमणूक कुणाच्याच कशी लक्षात येत नाही. आईजवळ बोलले तर ती म्हणते, ‘स्त्राr जन्माची अशीच कहाणी!’ एकदा वाटतं ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर स्पष्ट बोलावं.     परत वाटतं पंधरा वर्षे जे जपलं ते एका क्षणात मातीमोल होईल. आजवरच्या चांगुलपणाला कटुतेचा स्पर्श होईल. नकोच…. चाललंय तसंच चालू दे. पण परत वाटतं मीही माणूस आहे. मलाही बदल हवा ना… डोकं कलकलतं हो एकेकदा! आजवर आपल्या अनेक इच्छांना मुरड घालत बाकीच्यांच्या इच्छांना प्राधान्यक्रम दिला हेच चुकलं का? मॅडम, हल्ली पार्लरच्या कामातही उत्साह वाटत नाही हो… ‘एका मोकळय़ा श्वासासाठी’ धडपडतेय हो मी, असं म्हणतं ती ओक्साबोक्सी रडू लागली.

कौमुदीचं व्यक्तिमत्त्व, तिची कुटुंबासाठीची धडपड, चांगुलपणाच्या ओझ्याखाली तिची आता चाललेली घुसमट आणि तिला आवश्यक असणारा ‘बेक’, तिची मानसिक दमणूक हे सारं माझ्या लक्षात आलं होतं. परंतु त्यासाठी तिचा तिलाच प्रयत्नपूर्वक बदल करावा लागणार होता आणि नीट व्यक्त होण्यासाठी तिला मदतीची आवश्यकता होती. एका क्षणात बदल व्हावा अशी ‘जादूची कांडी’ तर कुणाकडेच उपलब्ध नसते परंतु टप्प्याटप्प्याने स्वतःवर मेहनत घेत ती सगळय़ा
प्रक्रियेला छान सहकार्य करत गेली आणि अखेर आवश्यक ते बदलही झाले. तिच्या सासूबाईही कधीकाळी दुसऱयाच्याच घरातून आलेल्या आहेत, याची जाणीव वेगळय़ा पद्धतीने तिने त्यांना करून दिली. आणि असं बोलणं कसं जिव्हारी लागतं हेही त्यांना समजावून सांगितलं. ती सुद्धा आता व्यक्त व्हायला लागली आहे. हे कळल्यावर त्यांच्या ‘यू मस्ट’ या धोरणातही हळूहळू लवचिकता आली. बऱयाच गोष्टी सोप्या झाल्या.

आज 21 व्या शतकात जशी संपूर्ण बंधनमुक्त जगण्याची मानसिकता असलेली माणसं असतात तशी कौमुदीसारखी तोंडातून चकार शब्द न काढता चांगुलपणा जपणारीही माणसं आढळतात. दोन्ही गोष्टींचा अतिरेक हा त्रासदायक असतो. सासरच्या कुटुंबाला आपलं मानून त्यात सर्वस्व झोकून देणारी ‘स्त्राr’ शेवटी ‘दुसऱयाच्याच घरातून’ आलेली राहते का? तिचं हे लेबल ‘कायम असंच राहतं का? हे कौमुदीचे प्रश्न अनेक महिलांच्या मनातील प्रश्न असू शकतात. कुटुंबासाठी जीव ओतून अनेक गोष्टी करत असतानाही काही गोष्टी कुटुंबातील माणसांकडून जेव्हा वेगळय़ा रीतीने समोर येतात त्यावेळी वेगवेगळय़ा अँगलनी हा प्रश्न अनेक स्त्रियांना अस्वस्थ करतो. तसं पहायला गेलं तर कायदाही सासरच्या मालमत्तेत ‘तिला’ तसे थेट अधिकार देत नाही. त्यात काही संदिग्धता आढळते, तर माणसांचं काय? आजवरच्या वाटचालीत अनेक अधिकार स्त्रियांना झगडून मिळवावे लागले, हे तर सर्वज्ञातच आहे.

मुळातच स्वहितासाठी स्वतःच काही गोष्टी करायला शिकणं आवश्यक आहे. जसं व्यक्त व्हायला येता हवं तसंच नकार देण्याची कलाही आत्मसात करायला हवी. वर्षाचे 365 दिवस तुम्ही न कुरकुरता सारं सांभाळून आपलं कुटुंबही नीट सांभाळताय, मग त्यातले चार दिवस आपल्यासाठी काढणं, रिलॅक्स होणं यात वावगं ते काय? माझी म्हणून काही गरज आहे ही गोष्ट आपण स्वीकारली की अपराधीपणाची भावना अस्वस्थ करत नाही. चांगुलपणाचं ओझंही वाटत नाही, नाहीतर आपणच लावलेल्या सवयींच्या जाळय़ात आपणच अडकत जातो. वरकरणी त्या चांगुलपणाचं विणकाम कितीही सुंदर भासलं तरीही त्यात अडकून जर घुसमट होऊ लागली तर वेगळय़ा समस्या निर्माण होऊ शकतात. कधीतरी निवांतपणा हवा असं वाटणं ही गरज आहे, मनाच्या उत्तम मशागतीसाठी. अशा रूपानं होणारं मनाचं सर्व्हिसिंग आवश्यकही आहे. स्त्राrचं स्त्राrत्त्वापलीकडचं माणूसपण जपण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न झाला तर अनेक गोष्टी सोप्या होतील. आपल्यातील चांगुलपणा हा कुमकुवतपणा बनू न देता सजग राहिलं तर ‘एका मोकळय़ा श्वासासाठी’ तिला इतकी धडपड करावी लागणार नाही, हे मात्र खरे!   

Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583