|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जमिनीचा तुटवडा : जुन्या कबरी खोदून पुरले जाताहेत नवे मृतदेह

जमिनीचा तुटवडा : जुन्या कबरी खोदून पुरले जाताहेत नवे मृतदेह 

दक्षिण आफ्रिकेच्या शहरातील स्थिती : दर आठवडय़ाला 60 जुन्या कबरींचे खोदकाम 

वाढत्या लोकसंख्येमुळे जोहान्सबर्गसमोर विक्राळ समस्या

  वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये मृतदेह दफन करण्यासाठीची जागाच अपुरी पडत आहे. या स्थितीपोटी बहुतेक लोक नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारापूर्वी अगोदरच अस्तित्वात असलेल्या कबरी पुन्हा खोदत आहेत. दर आठवडय़ाला शहरात 50 ते 60 कबरी पुन्हा खोदल्या जात आहेत. अगोदरच दफन करण्यात आलेल्या मृतदेहाच्या वरील भागात आणखी एक मृतदेह दफन करण्यासाठी हे पाऊल उचलले जातेय.

जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेचे मुख्य वित्तीय केंद्र असून येथील वाढती लोकसंख्या आणि विदेशींचे प्रमाण वाढल्याने शहरी भागावरील भार सातत्याने वाढतोय. लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात न आल्यास पुढील 50 वर्षांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी कोणतीच जागा शिल्लक राहणार नसल्याचे अधिकाऱयांचे सांगणे आहे.

शहराच्या दफनभूमीचे व्यवस्थापन हाताळणाऱया विभागाचे व्यवस्थापक रेजी मोलोई यांच्यानुसार कबरींसाठी खुल्या जागा वेगाने संपत चालल्या आहेत. लोक मोठय़ा संख्येत शहरात धाव घेत असून यात विदेशी नागरिकांचा देखील समावेश असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 

कबरींसाठीच्या जागेचा तुटवडा असणारे जोहान्सबर्ग एकमात्र शहर नाही. यापूर्वी डरबन येथे देखील सुमारे 3 दशकांपूर्वी हीच समस्या उद्भवली होती. परंतु तेव्हा ही समस्या एचआयव्ही/एड्समुळे मृत्युमुखी पडणाऱयांची वाढती संख्या आणि राजकीय हिंसाचारामुळे निर्माण झाली होती.

दुसऱया पर्यायांची आवश्यकता

दक्षिण आफ्रिकेच्या सिमिट्री (कब्रिस्तान) असोसिएशनचे अध्यक्ष डेनिस इंग यांच्यानुसार मृतदेह पुरण्यासाठीची जागा लवकरच संपेल हे लोकांना समजून घ्यावे लागेल. अशा स्थितीत कबरींचा पुनर्वापर करणे आणि मृतदेह जाळण्याच्या पर्यायाबद्दल विचार करावा लागेल. परंतु आफ्रिकेतील समुदायांमध्ये अद्याप मृतदेहावर अग्निसंस्कार करणे अनैसर्गिक आणि परंपरेच्या विरोधात मानले जाते. तसेही आफ्रिकेत मृतदेहावर अग्निसंस्काराची अनुमती मिळणे देखील अवघड आहे. माणूस पूर्ण शारीरिक स्वरुपात देवाजवळ पोहोचावा असे काही परंपरांचे पालन करणाऱया व्यक्तींचे मानणे आहे.

पुनर्वापराचा कायदा शक्य

कबरींच्या मोठय़ा कमतरतेला तोंड देण्यासाठी सरकार लवकरच एका कायद्याचा प्रस्ताव मांडू शकते, यांतर्गत मोकळी जमीन सरकार ताब्यात घेऊ शकते. कायद्याच्या माध्यमातून वर्णभेद आणि वसाहतवादानंतर निर्माण झालेली असमानता संपविण्यास मदत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकांना कबरीसाठी जागा मिळू शकेल.