|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाच राज्यातील ‘सेमी फायनल’चा आज निकाल

पाच राज्यातील ‘सेमी फायनल’चा आज निकाल 

एक्झीट पोलमुळे सगळेच पक्ष गॅसवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राजस्थान, मध्यप्रदेशसह छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 11 रोजी होत आहे. लोकसभा 2019च्या निवडणुकीची सेमी फायनल म्हणूनच ही निवडणूक ओळखली जात होती. एक्झीट पोलने विपरीत अंदाज व्यक्त केल्याने सगळय़ाच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते गॅसवर आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून संबंधित जिल्हा मुख्यालयामध्ये मतमोजणी सुरु होईल. प्रारंभी पोस्टल मते मोजली जातील. त्यानंतर मुख्य मतमोजणी सुरु होईल, असे प्रशासकीय अधिकाऱयांनी सांगितले.

साधारणपणे सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान काही निकाल अपेक्षीत आहेत तर दुपारी 2 नंतर साधारणपणे कल स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसह संपूर्ण देश व प्रादेशिक पक्षांचेही या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

मध्यप्रदेशात भाजपची परीक्षा

मध्यप्रदेशमध्ये एक्झीट पोल प्रसिद्ध होण्याआधी जोरदार संघर्ष होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. निवडणूक पूर्व भाकितांमध्येही असेच मानले जात होते. परंतु मतदानोत्तर कलचाचणीमध्ये भाजप आणि काँग्रेस दोघांनाही समान संधी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात 8 संस्थांच्या माध्यमातून अंदाज घेण्यात आला. परंतु यातील चार संस्थांनी काँग्रेसला तर चार संस्थांनी भाजपला संधी असल्याचे म्हटले आहे. गेल्यावेळी भाजपने 230पैकी 165 जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले होते. तर काँग्रेस 58, बसपा 4 व इतर 3 असे पक्षीय बलाबल होते. आता काँग्रेस सत्ता प्राप्त करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरीही भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी मात्र भाजप चौथ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार का ?

सलग दोनवेळा राजस्थानमध्ये कोणालाही सत्ता स्थापन करता आलेली नाही. यावेळी ही परंपरा भाजप मोडणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. तथापि एक्झीट पोलने काँग्रेसलाच झुकते माप दिल्याने भाजपच्या गोटात धाकधूक निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मात्र भाजपच पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी निवडणूक झाली आहे.  सध्या भाजपची सत्ता असून 163 काँग्रेसला 21, बसपा 3 व अन्य 13 असे पक्षीय बलाबल आहे.

छत्तीसगढमध्ये रमणसिंहच पुन्हा मुख्यमंत्री

गेल्या 15 वर्षांपासून भाजपची येथे सत्ता असून रमणसिंह पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज आहे. तसे झाल्यास त्यांच्या नावावर नवा विक्रम स्थापित होणार आहे. छत्तीसगढमध्ये 90 जागा असून गेल्यावेळी भाजपला 49, काँग्रेस 39, बसपा 1 व अन्य 1 असा निकाल होता.

तेलंगणा व मिझोराम

तेलंगणामध्ये टीआरएसला बहुमताची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता आहे.119 जागी निवडणूक झाली असून गेल्यावेळी टीआरएस 63, काँग्रेस 21, टीडीपी 15, भाजप 5, अन्य 15 अशी स्थिती होती. तर मिझोराममध्ये काँग्रेससमोर अनेक अडचणी आहेत. एमएनएफने काँग्रेसला मोठे आव्हान दिल्याचे चित्र येथे आहे. येथे 40 पैकी 35 जागांवर काँग्रेसने तर 5 जागांवर एमएनएफने विजय मिळवला होता. परंतु यावेळी एमएनएफने चांगलीच तयारी केली असून काँग्रेसला अडचणी येण्याची शक्यता आहे.

Related posts: