|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » चारही हत्यांचा तपास सीबीआय करू शकते

चारही हत्यांचा तपास सीबीआय करू शकते 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे,
प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यामागे समान धागा असेल तर, त्याचा तपासही एकच संस्था करू शकते, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. चारही हत्यांचा तपास एकत्रित का करण्यात येऊ नये, याचा खुलासा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात करा, असा आदेशही यू. यू. ललित आणि नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने दिला.

 दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्येमागे समान धागा आहे. एकाच उद्देशाने त्या झाल्या आहेत. याचा तपास एकाच संस्थेने करावा, अशी मागणी करणारी याचिका प्रा. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांनी 10 जानेवारी 2018 रोजी दाखल केली होती. यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा तपास अहवाल कर्नाटक पोलिसांनी सादर केला. या दोन्ही हत्येमध्ये समान धागा व एकाच उद्देशाने झाल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. याप्रकरणी आम्ही पुढील तीन महिन्यात आरोपपत्र सादर करणार असल्याचेही कर्नाटक सरकारच्या वकिलांनी सांगितले.  यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. तर गोविंदराव पानसरे हत्येचा खटला सध्या कोल्हापुरच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. चारही हत्यांमागे समान धागा असेल आणि उद्देश एकच असेल तर सीबीआय याचा एकत्रित तपास करू शकते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. एकत्रित तपासाबाबतचा अहवाल सीबीआयने 10 जानेवारीपर्यत सादर करावा, असा आदेशही खंडपीठाने दिला.

 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती. यानंतर2015मध्ये पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या झाली. 5 सप्टेंबर 2017मध्ये बेंगळूर येथे पत्रकार गौरी लंकेश यांचीही गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. देशातील विचारवंताच्या हत्यांवर चिंता व्यक्त करत याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि सीबीआय आणि महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने अहवाल सादर करावा, असा आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Related posts: