|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रेणुका मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्यासाठी पाठपुरावा करावा

रेणुका मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्यासाठी पाठपुरावा करावा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

सौदत्ती यात्रेदरम्यान, रेणुका (सौंदत्ती) मंदिराचे चारही दरवाजे खुले ठेवण्याची विनंती कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्हा प्रशासन व सौंदत्ती देवस्थान समितीकडे करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाने सहायक पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना दिले. सौंदत्ती डोंगरावर भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबतचा पाठपुरावाही बेळगाव प्रशासन व सौंदत्ती देवस्थान समितीकडे करण्यात यावा, अशीही मागणी डॉ. मोरे-धुमाळ यांच्याकडे शिष्ठमंडळाने केली.

  मागील आठवडय़ात करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांना सौंदत्ती देवस्थान समिती व सौंदत्ती डोंगर पोलीस ठाण्याकडे यात्रा कालावधीत भाविकांना सहन कराव्या लागणाऱया त्रासाचा पाढा वाचला होता.   हाच पाढा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष मोहनराव साळोखे यांनी मोरे-धुमाळ यांच्यासमोर वाचला. ते म्हणाले, येत्या 21 डिसेंबरला सौंदत्ती डोंगरावर यात्रा साजरी होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील पाच ते सात लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर येतात. त्यांना दर्शन घेताना अनेक प्रकारच्या त्रासाला बळी पडावे लागते. रेणूका (सौंदत्ती) मंदिराला असलेल्या चारपैकी एकच दरवाजा यात्रा काळात खुला ठेवल्याने भाविकांनी रेणुकादेवीचे निट दर्शन होत नाही. तेव्हा मंदिराचे चारही दरवाजे खुले ठेवण्यासाठी व्यवस्थापनाकडे लवकरात लवकर पाठपुरावा होणे आवश्यक आहे. डोंगरावर पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे भाविकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. डोंगर व परिसरात भाविकांना वाहनांची नादुरुस्ती, जेवण न मिळणे, अपघात, चोऱया, मद्यपींची हुल्लडबाजी अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. यातून भाविकांची सोडवून होणे आवश्यक आहे. तेव्हा बेळगाव प्रशासनाने भाविकांसाठी सौंदत्ती डोंगर परिसरात हेल्पलाईन क्रमांकांचे फलक लावणे आवश्यक आहे. जोगनभावी कुंडावर शॉवरचीही व्यवस्था करण्यासाठीही बेळगाव प्रशासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक आहे.

  यानंतर मोरे-धुमाळ यांना यात्रेसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन मोहनराव साळोखे यांनी दिले. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात अच्युतराव साळोखे, अशोकराव जाधव, संभाजी ऊर्फ बंडा साळोखे, महेश उरसाल, किशोर घाटगे, मनोहर सोरप, सुवर्णा पवार, मधुकर नाझरे, संजय मांगले, श्रीकांत कारंडे, सुरेश बिरंबोळे, अनिल देवणे, किरण मोरे, बाबुराव पाटील, प्रसाद जाधव, सरोज फडके, सचिन सोहनी आदींचा समावेश होता.