|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मगरीशी झुंजणाऱया बालकाला वीरता पुरस्कार

मगरीशी झुंजणाऱया बालकाला वीरता पुरस्कार 

 केंद्रपाडा / वृत्तसंस्था :

ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्हय़ातील एका दुर्गम गावात स्वतःच्या काकाला मगरीच्या हल्ल्यापासून वाचविताना अद्भूत साहसाचे प्रदर्शन करणाऱया बालकाची राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कंदिरा गावातील शासकीय वासुदेव विद्यापीठ हायस्कूलमधील दहावीचा विद्यार्थी सीतू मलिकला (15 वर्षे) 23 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वीरता पुरस्कार प्रदान करणार आहेत.

सीतूने यंदा 20 फेब्रुवारी रोजी गावातील तलावात मगरीच्या हल्ल्यातून स्वतःच्या काकाला वाचविले होते. सीतूने हुशारी दाखवून बांबू हातात घेऊन मगरीच्या डोक्याच्या वरील भागावर अनेक वार केले होते. मगरीने सीतूच्या काकाला जबडय़ात पकडले होते. सीतूने केलेल्या वारमुळे मगरीने विनोद मलिक यांना सोडून खोल पाण्यात धाव घेतली होती.

जिल्हय़ातील मुलाची राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने आम्हाला अभिमान वाटतोय. या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड भारतीय बाल कल्याण परिषदेने केली असून पंतप्रधान पुढील महिन्यात हा पुरस्कार प्रदान करणार आहेत. यासंबंधी आयसीसीडब्ल्यूचे पत्र जिल्हा प्रशासनाला मिळाल्याची माहिती केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी दसरथी सत्पथी यांनी दिली.

आमच्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय ओळख मिळाली असून तो पंतप्रधानांना भेटणार असल्याचे उद्गार सीतूच्या शाळेचे मुख्याध्यापक महेश्वर राउत यांनी काढले आहेत.