|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आम्हाला जुन्याच योजनेद्वारे पाणी सोडा!

आम्हाला जुन्याच योजनेद्वारे पाणी सोडा! 

वार्ताहर /निपाणी :

निपाणीत 24 तास पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत अनेक त्रुटी असताना सुरू झालेली ही योजना नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच भरीत भर म्हणून पाणीपुरवठा नियोजन कोलमडले आहे. परिणामी व्यवस्थापनात त्रुटीचा डोंगर उभारल्याचे दिसत आहे. यामुळे 24 तास पाण्याचे तीनतेरा वाजल्याचा संताप काही विभागातून व्यक्त होत आहे. असे असताना पुन्हा जुनीच योजना सुरू करुन पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

रामनगर परिसरात गुरुवारी दुपारी 24 तास योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सहा दिवसानंतर पाणी आल्याचे समजताच अनेक नागरिक व महिला कामावर अर्धा दिवस सुटी घालून घराकडे परतले. पण सोडण्यात आलेल्या पाण्याचा दाब कमी असल्याने एक तासाला एक घागरही पाणी मिळत नव्हते. यामुळे नागरिक व महिलांनी संताप व्यक्त करताना पालिका कर्मचाऱयांना धारेवर धरले.

जैन इरिगेशनच्या अधिकाऱयांसह पालिका आयुक्त व माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. यानंतर कर्मचाऱयांनी चुकीच्या नियोजनातून पाणी सोडल्याचे निदर्शनास आले. यामुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. काही वेळाने सुरळीत योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

योजनेत अनेक त्रुटी

24 तास पाणी योजना सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी योग्य दाबाने पाणीपुरवठा होतो. पण बऱयाच ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. योजनेतील त्रुटी याला कारण आहेतच. पण व्यवस्थापनही योग्य नाही. यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी व्यक्त केली.