|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिक्षकांनी ज्ञानाची गंगा वाहती करावी

शिक्षकांनी ज्ञानाची गंगा वाहती करावी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिक्षणाच्या वारीत लागलेल्या स्टॉलच्या माध्यमातून शिक्षकांसह विद्यार्थ्यांची बुध्दी  कुशाग्र झाली आहे. या शिक्षणाच्या वारीतील ज्ञानाची गंगा वाहती राहावी, यासाठी ज्ञानवंत शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भक्ती सेवा विद्यापीठाचे चेअरमन ऍड. धनंजय पठाडे यांनी केले.

तपोवन मैदानावरील आयोजित शिक्षणाच्या वारीच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षणाच्या वारीला तीन दिवसात सात जिल्हय़ातील सुमारे 20 हजार शिक्षक व शिक्षण प्रेमींनी भेट देवून, विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती करून घेतली.

ऍड. पठाडे म्हणाले, शिक्षणाची वारी या उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पनांची माहिती शिक्षकांनी मिळाली आहे. तसेच उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून आपल्या संकल्पनेतून एखादा प्रयोग तयार करण्याची प्रक्रिया समजली. एखादे अवघड गणित कसे सोपे करून सोडवावे, भूमितीची प्रमेय आदींचा ज्ञानसंचय झालेला आहे. या ज्ञानाचा उपयोग आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी केला पाहिजे.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत या वारीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, सोलापूर ,सांगली, सातारा ,कोल्हापूर ,रत्नागिरी  व सिंधुदुर्ग या सात जिल्हय़ातील शिक्षक व पालकांनी शिक्षणाच्या वारीचा लाभ घेतला. येथील 52 शैक्षणिक स्टॉलवर वेगवेगळे प्रयोग मांडण्यात आले होते. या तंत्रस्नेही शिक्षकांचे कौतुक सर्वत्र होत होते. 

प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी प्रास्ताविक केले.  संदीप मगदूम, सविता कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी उपसंचालक शोभा खंदारे, मुंबईचे समन्वयक अंकुश बोबडे, दत्तात्रय वाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार, एस. के. यादव, नीता करवंजे, पल्लवी चिंचोळकर, डॉ. सुरेश माने, तुकाराम कुंभार, संजय लोंढे, राजेंद्र पाटील, प्रदीप मगदूम, अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते.

Related posts: