|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाबळेश्वरात झोपडपट्टीला आग

महाबळेश्वरात झोपडपट्टीला आग 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

येथील प्राथमिक शाळा क्र. 1 च्या पाठीमागील तर नगरपालिका सोसायटीजवळ असलेल्या झोपडपट्टीला आग लागुन आगीत तीन ते चार झोपडय़ा जळुन खाक झाल्या. सुदैवाने या आगीत जिवीतहानी झाली नाही. मात्र झोपडय़ा व त्यामधील संसारोपयोगी साहित्य जळुन कष्टकरी लोकांचे लाखो रूपयांचे मात्र नुकसान झाले. पालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी अग्नग्निशामक बंबाच्या मदतीने झोपडय़ांना लागलेली आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा या परिसरातील सुमारे वीस झोपडय़ा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या. 

  हॉटेल व्हॅली व्हय़ु शेजारी पालिकेच्या छोटय़ा मैदानाला लागुन गेली अनेक वर्षांपासुन एक झोपडपट्टी येथे वसली आहे. पुर्वी येथे चार ते पाच झोपडय़ा होत्या, परंतु गेली तीन ते चार वर्षात या झोपडय़ांची संख्या सुमारे वीसपर्यंत वाढली आहे. या सर्व झोपडय़ा विनापरवाना आहेत. या झोपडय़ांमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार राहतात. शुक्रवारी सकाळीच झोपडपट्टीतील कामगार हे कामावर गेले होते. महिलाही कामावर गेल्या होत्या तर मुले शाळेत गेली होती. सकाळी साडे दहाच्या दरम्यान एका झोपडीला आग लागली. झोपडीवर टाकलेल्या प्लास्टिक, फ्लेक्स, टायर, प्लास्टिक पोती टाकल्याने आगीने रौद्ररूप धारण केले व या आगीने तीन झोपडय़ांना विळखा घातला.

   दरम्यान, आग लागल्याचे वृत्त परिसरात पसरताच स्थानिक नागरिक मोठय़ा प्रमाणावर लोक या झोपडपट्टीकडे धाव घेवुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज शिवप्रताप दिन असल्याने महाबळेश्वर येथील सर्व आपतकालिन यंत्रणा किल्ले प्रतापगडावर गेल्याने झोपडपट्टीची आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचा छोटी बंब गाडी तेथे आली, परंतु या बंबाला आग आटोक्यात आली नाही. बंब परत पाणी भरण्यास फिरला तेव्हा स्थानिक नागरिकांनी बाजुच्या दोन हॉटेलमधील तर काही नागरिकांच्या घरातील पाण्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यामध्ये राहुल पिसाळ, ऋषिकेश वायदंडे, विजय गायकवाड, पेषित गांधी, शुभम खरे, विशाल तोष्णीवाल, ओंकार काळे, सुमित कांबळे, गणेश सुतार, सचिन चव्हाण, शेख सैफ वारूणकर, अमोल साळुंखे, अनिकेत मोरे, सहदेव सपकाळ, अजय राठोड, अनिकेत वायदंडे, सचिन बगाडे, विनय गायकवाड, ऋषिकेश लोहार, अजय कांबळे, अस्लम मानकर आदी स्थानिक युवकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

 दरम्यान, किल्ले प्रतापगडावर गेलेला मोठा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यत आगीत मोहन कारंडे, सिध्दमा बडगे, सिध्दमा कली यांच्या झोपडय़ा आगीत पुर्ण जळुन खाक झाल्या तर लक्ष्मी बडगे यांची झोपडी अर्धवट जळली. या आगीने झोपडय़ासह त्यातील संसारोपयोगी साहित्य व इतर ऐवज या आगीत जळुन खाक झाला. पोलीस, पालिका व महसुल विभागाचे अधिकारी दुपारपर्यंत घटनास्थळाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीधारकातुन व नागरिकातुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.        

  या आगीची खबर मिळताच झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांनी घटनास्थळी भेट देवुन झोपडपट्टीधारकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप कांबळे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे हेही उपस्थित होते. भगवान वैराट यांनी या आगीमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.