|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष

सरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष 

वृत्तसंस्था/ लाहोर

पाकिस्तानच्या कारागृहात खून झालेले भारतीय नागरिक सरबजित सिंग यांच्या मारेकऱयाची शनिवारी लाहोर जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 2013 मध्ये कोट लखपत कारागृहात सरबजीत सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. गेली पाच वर्ष या खून खटल्यावर सुनावणी सुरू होती.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात 1990 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी त्यावेळी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असणारे भारतीय नागरिक सरबजित सिंग यांना अटक झाली होती. त्यांच्याविरोधातील सर्व आरोप निराधार आहेत. ते निर्दोष असून त्यांना बॉम्बस्फोटप्रकरणी गोवण्यात आल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले होते. तसेच त्यांच्या सुटकेची मागणीही केली होती. बॉम्बस्फोटप्रकरणी पाकिस्तान न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. कोट लखपत कारागृहात एप्रिल 2013 मध्ये फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी अमीर सरफराझ ऊर्फ तांबा व मुद्दसर बशीर या दोघांनी सरबजित सिंग याच्या डोक्यात धारदार वस्तू मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 मे 2013 रोजी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यूपूर्वी जबाबही घेण्यात आला नव्हता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीश मझहर नकवी यांची एक सदस्यीय न्यायिक समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. विशेष म्हणजे दोघा मारेकऱयांनीही नकवी यांच्यासमोर खुनाची कबुली दिली होती. मात्र न्यायालयात सुनावणी याप्रकरणी एकही साक्षीदारसमोर आला नाही. यावरून न्यायालयाने कारागृह प्रशासनाला फटकारले होते. पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे लाहोर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले.