|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आणखी एका जलतरणपटूचा बुडून मृत्यू

आणखी एका जलतरणपटूचा बुडून मृत्यू 

चिवला बीचवर घटना : घाटकोपरहून आले होते स्पर्धेसाठी

वार्ताहर / मालवण:

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक अरुण मारुती वराडकर (65,  रा. घाटकोपर, मुंबई) हे जलतरणपटू रविवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास चिवला बीच येथील समुद्रात अचानक बुडाले. त्यांना स्थानिक युवकांनी समुद्रातून बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. वराडकर यांचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी सकाळी महिला जलतरणपटू सुरेखा गलांडे स्पर्धेसाठी सराव करताना बुडून मृत्यूमुखी पडल्या होत्या. ही घटना ताजी असतांनाच रविवारी दुसऱया जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याने स्पर्धेला गालबोट लागले आहे.

 रविवारी सकाळी चिवला बीचवर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले अरुण मारुती वराडकर हे चिवला बीच समुद्रात बुडताना दिसून आले. स्पर्धेतील काही मीटर अंतर त्यांनी कापले होते. स्थानिक युवकांनी पातीच्या सहाय्याने वराडकर यांना समुद्रातून बाहेर काढले. फ्रान्सीस फर्नांडिस, संतोष परब, रोहित मेथर, सागर जाधव, वसंत गावकर, निखिल वराडकर यांनी 108 रुग्णवाहिकेतून वराडकर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

 रुग्णालयात डॉ. बालाजी पाटील, डॉ. अजित लिमये यांनी वराडकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, किसन मांजरेकर, गणेश कुडाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार, स्वप्नील तांबे यांनी पंचनामा केला.

घाटकोपरच्या ग्रुपमधील सदस्य

घाटकोपर येथील जलतरणपटूंचा ग्रुप जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी मालवणात आला होता. या ग्रुपमध्ये वीसजण होते. त्यांनी शनिवारी चिवला बीच येथे पोहोण्याचा सराव केला. या सरावात वराडकर हेदेखील सहभागी झाले होते. रविवारी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वराडकर यांनी आपले कपडे ग्रुपमधील एका सदस्याकडे दिले होते. गुपमधील अन्य सदस्यही पोहोण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्याने वराडकर बुडाल्याची माहिती त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना दुपारनंतर समजली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करा – तोरसकर

जलतरण स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांकडून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध न केल्याने सलग दोन दिवस दोन स्पर्धकांना आपला जीव गमवावा लागला. याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रवीकिरण तोरसकर यांनी थेट कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून करत पारितोषिक वितरण समारंभ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोरसकर यांनी आयोजनाबद्दलही नाराजी व्यक्त केली.