|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कीर्तनामुळे बौद्धिक विकास, संस्कृती संवर्धनाचा पाया भक्कम

कीर्तनामुळे बौद्धिक विकास, संस्कृती संवर्धनाचा पाया भक्कम 

संजीव झर्मेकर यांचे उद्गार, वाळपईत राष्ट्रीय कीर्तन मालेतून चरित्र सादर

प्रतिनिधी/ वाळपई

 गोव्यातील कीर्तनाला विशेष परंपरा आहे. त्यात काळाप्रमाणे बदल होत आहे. कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करता येते. कीर्तनाच्या माध्यमातून मोठी झालेली व्यक्तिमत्वे कीर्तनासाठी वेळ देत नाहीत हेही कटू सत्य आहे. कीर्तनकारांनी कीर्तनसेवा अखंडितपणे चालू ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम समाजमनावर होऊ शकतात. कीर्तनकारांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजामध्ये बौद्धिक विकासाबरोबरच संस्कृती संवर्धनाचा पाया अधिक भक्कम होणार आहे, असे प्रतिपादन गोवा कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी संजीव झर्मेकर यांनी केले.

कै. गोविंदशास्त्री भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोवा मराठी अकादमी व सत्तरी इतिहास संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने काणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तिसऱया राष्ट्रीय कीर्तनमालेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, ज्ये÷ कीर्तनकार नारायण बर्वे. हरिभक्त परायण संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रदास जोशी, इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक ऍड. शिवाजी देसाई, मराठी अकादमीच्या सत्तरी विभागाचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते सदानंद काणेकर आदींची उपस्थिती होती.

झर्मेकर यांनी कीर्तनाचा अध्याय व भविष्यात कीर्तनासाठी आवश्यक असलेले उपाय यावर विचार मांडले. गोमंतकात अस्तित्वात असलेल्या पारंपरिक कलांना राजाश्रय मिळालेला आहे. ही जमेची बाजू असून याच माध्यमातून पारंपरिक कला विकसित करण्याचे कार्य जोमाने पुढे जाणे गरजेचे आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आदर्श पिढी घडविण्याची प्रक्रिया पुढे जात असते, असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

भाषावादामुळे गोव्याचे नुकसान

अनेक वर्षापासून गोव्यामध्ये प्रलंबित असलेल्या भाषावादातून आपल्या पिढीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भाषावादासाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय कीर्तनमालेच्या माध्यमातून गोमंतकीय लढय़ासाठी आपले महत्त्वाचे योगदान देणाऱया स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समाजापुढे आणण्याचे प्रयत्न कीर्तनमालेच्या उपक्रमातून होत आहेत. यामुळे प्रत्येक पंचक्रोशीमध्ये कीर्तनकार घडणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शेवटी झर्मेकर यांनी व्यक्त केले.

माजी उपसभापती नरहरी हळदणकर व चंद्रदास जोशी यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायणबुवा बर्वे यांनी केले. कीर्तनमालाच्या आयोजनासंदर्भाचा हेतू त्यांनी प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केला. व्यासपीठावरील मान्यवराचे स्वागत भास्कर साठे, नितीन बर्वे, गुरुदास सुतार, सुनील माऊसकर, विजय नाईक, विवेक जोशी यांच्याहस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. स्वागत व मान्यवरांचा परिचय ऍड. शिवाजी देसाई यांनी करून दिला.

मंगलचरणाने सुखावह प्रारंभ

प्रारंभी विठ्ठल गावस व गुरदास सुतार यांनी सादर केलेल्या मंगलचरणाने कीर्तनमालेला प्रारंभ करण्यात आला. अगदी उत्साही वातावरणात सुरू करण्यात आलेल्या मंगलचरणाच्या कार्यक्रमात तबल्यावर ज्ञानेश्वर नाईक यांनी तर हार्मोनियमवर मनोज गणपुले व विवेक जोशी यांनी साथसंगत
केली.

सहा स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर सन्मान

यावेळी गोवा मुक्ती लढय़ासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया एकूण सहा स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांनी हा गौरव स्वीकारला. गौरवमूर्तींमध्ये स्वातंत्र्यसैनिक कै. नरहरी काळे (माळोली), स्वतंत्र्यसैनिक कै. आनंद अभ्यंकर (आंबेडे), स्वातंत्र्यसैनिक गजानन जोशी (हेदोडे),  स्वतंत्र्यसैनिक कै. शिवराम बर्वे, स्वतंत्र्यसैनिक कै. अनंत जोशी (नगरगाव ) यांचा समावेश आहे.

महात्म्यांच्या जीवनावर कीर्तन

त्यानंतर कीर्तनकार विवेक जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर सुश्राव्य कीर्तन सादर केले.  भोजनानंतरच्या  दुसऱया सत्रात राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर गिताश्रुती वझे यांचे कीर्तन झाले. हुतात्मा बाळा मापारी यांच्या जीवनावर कीर्तनकार गुरुदास सुतार यांनी कीर्तन सादर केले. त्यांना मनोज गणपुले, ज्ञानेश्वर नाईक, सुनील माऊसकर, महेश गावस, सुनील म्हाऊसकर विठ्ठल गावस, नितीन बर्वे, सुनील पर्येकर, रामचंद्र नाईक, सिद्धार्थ जोशी, शैलेश शिरोडकर यांनी साथसंगत
केली.

Related posts: