|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकरांची स्फूर्तिदायी व्हिलपॉवर!

पर्रीकरांची स्फूर्तिदायी व्हिलपॉवर! 

आजारी असूनही पुलाच्या बांधकामाची पाहणी

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाचे भांडवल करून टीका करणाऱया विरोधकांच्या तेंडाला टाळे ठोकण्यासारखे काम रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी केले. दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री थेट मांडवीतील तिसऱया पुलावर गेले. तब्बल 45 मिनिटे मुख्यमंत्र्यांनी पुलाची पाहणी केली. पुलाचे बांधकाम करणाऱया लार्सन ऍण्ड टुब्रो कंपनीच्या अभियंत्यांशी त्यांनी कामाच्या प्रगतीबाबत चर्चाही केली. एवढेच नव्हे तर नंतर त्यांनी झुवारी पुलाच्या कामाचीही पाहणी केली. या कृतीतून पर्रीकरांनी पुन्हा एकदा आपल्यातील व्हिलपॉवर म्हणजे इच्छाशक्तीची प्रचिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत विरोधी पक्षासह अन्य टीकाकारांनीही टीका चालविली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर स्वतः प्रशासकीय कामकाज हाताळतात की नाही किंवा फाईलवर सह्या करतात की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱया सर्वांनाच पर्रीकरांनी आपल्या या कृतीतून चोख उत्तर दिले आहे. पर्रीकर केवळ प्रशासनच चालवत नाहीत समुद्रपातळीपासून खूप उंच असलेल्या तिसऱया मांडवी पुलावर जाऊन स्वतः पाहणी करतात व सूचना देतात हेही त्यांनी दाखवून दिले. एल ऍण्ड टी कंपनीच्या अभियंत्यांसह राज्य साधनसुविधा महामंडळाचे अधिकारीही यामुळे अचंबित झाले.

तब्बल 45 मिनिटे मांडवी पुलाची पाहणी

मुख्यमंत्री दुपारी 3.30 वाजता मांडवी पुलावर गेले. तब्बल 45 मिनिटे त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. कामाच्या प्रगतीबाबत चर्चाही केली. कामाच्या स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच कामाच्या गतीबाबतही त्यांनी अभियंत्यांना विचारणा केली. आवश्यक सूचनाही केल्या. पुलाच्या खाबांचे नंबरही मुख्यमंत्र्यांना तोंडपाठ असल्याचे यावेळी दिसून आले. या 45 मिनिटांच्या कालावधीत त्यांनी पुलाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला.

विरोधकांना सणसणीत चपराक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणावर बोट ठेऊन काँग्रेस पक्षाने टीका चालवलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे किंवा आपल्याकडील खात्यांचे वाटप इतर मंत्र्यांना करावे, अशी मागणीही चालविली आहे. मुख्यमंत्र्यांनी पद सोडावे यासाठी काँग्रेसने आंदोलनही केले. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते राजन घाटे यांनी आझाद मैदानावर दहा दिवस उपोषणही केले. या सर्वांना पर्रीकरांनी काल रविवारी चोख उत्तर दिले आहे.

ट्रोजन डिमोलोंची न्यायालयात याचिका

मुख्यमंत्री पर्रीकर कामकाज हाताळण्यास सक्षम आहेत किंवा नाही याबाबत स्पष्टिकरण द्यावे, यासाठी ‘लोकांचो आधार’ संघटनेचे नेते ट्रॉजन डिमेलो यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे. रविवारी मुख्यमंत्री स्वतः तिसऱया मांडवी पुलावर उपस्थित झाल्याने या सर्वच गोष्टींना ‘आँखो देखा’ उत्तर मिळाले आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना व टीकेला पर्रीकरांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.

सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

मुख्यमंत्र्यांनी तिसऱया मांडवी पुलाला भेट देऊन पाहणी केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भाजप नेत्यांनीही एकमेकांना फोन करून विचारणा केली. गोव्याच्या विविध भागातून कार्यकर्त्यांनी फोनाफोनी केली. पर्रीकरांनी आपल्या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

शनिवारी केले एनआयटीचे अनावरण

शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एनआयटीच्या कोनशिलेचे अनावरण केले होते. याप्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती होती. शनिवारी हा सोहळा पार पडल्यानंतर रविवारी त्यांनी मांडवी पुलाची पाहणी केली. त्याचबरोबर झुवारी पुलाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.

गोव्याचा विकासपुरुष…मनोहर पर्रीकर

विकासाचा ध्यास घेतलेल्या पर्रीकरांनी गोव्याचा चौफेर विकास केला आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत रस्त्यांचे जाळे विणले. आवश्यक तिथे पूल तसेच फ्लाय ओवर्सही उभारले. मागील सुमारे आठ वर्षांच्या कालावधीत पर्रीकर यांनी गोव्यात अभूतपूर्व असा विकास केला आहे. या विकासकामांवर साधारणपणे 30 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गोव्याचा विकासपुरुष असे म्हटले तरी त्यांच्याबाबतीत चुकीचे ठरणार नाही, असे मत सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातूनही व्यक्त केले जात आहे.

म्हणूनच त्यांना पर्रीकर म्हणतात : सिद्धार्थ कुंकळकर

मनोहर पर्रीकर हे एक जबरदस्त इच्छाशक्ती बाळगणारे व कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणारे असे नेते आहेत. म्हणूनच त्यांना पर्रीकर म्हणतात, असे उद्गार पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ पुंकळकर यांनी काढले. गोव्याच्या राजकारणातले पर्रीकर हे वेगळे नाव. अन्य नेत्यांची त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. पॅनक्रायाटीस कॅन्सरसारखा आजार असतानाही त्यावर मात करून सामोरे जाण्याची ताकद केवळ पर्रीकर यांच्यातच आहे. एरव्ही ते आमचे लाडके भाई, पण आज त्यांची कामगिरी पाहून ‘म्हणूनच त्यांना पर्रीकर म्हणतात’ असे म्हणण्याचा मोह होतो. ज्यांना अशा प्रकारचा आजार आहे त्यांच्यासाठी हे प्रेरणा देणारे उदाहारण आहे, असेही पुंकळकर म्हणाले.