|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सज्जनकुमारांना जन्मठेप

सज्जनकुमारांना जन्मठेप 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेस नेते माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यासह अन्य चौघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. हत्येचे कटकारस्थान, दंगल भडकवणे यामध्ये ते दोषी ठरले आहेत. त्यांचे साथीदार कॅप्टन भागमल, गिरधारी लाल आणि खासदार बलवान खोखर हेही दोषी आढळले असून त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सर्वांना 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयात शरण येण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तर अन्य दोन दोषी माजी आमदार महेंद्र यादव आणि किशन खोखर यांच्या शिक्षेत वाढ करुन 10 वर्षे करण्यात आली आहे.

न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्यायाधीश विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर याचिककर्त्यांच्या वकिलांसह इतरांनाही अश्रू अनावर झाले. ऍड. एच. एस. फुलका, अकाली दलाचे नेते मानजिंदरसिंह सिरसा यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. तसेच सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरुच ठेऊ, त्याशिवाय यामध्ये प्रोत्साहन देऊन दोषींना निर्दोष ठरवणाऱया गांधी परिवारालाही तुरुंगात पाठवेपर्यंत आम्ही निकराचा लढा देऊ, असे म्हटले आहे.

या हत्याकांडाबाबत टिप्पण्णी करताना न्यायालयानेही गंभीर वक्तव्ये केली आहेत. 1947 च्या फाळणीनंतर उसळलेल्या खुल्या हत्याकांडासारखा प्रकार 37 वर्षानंतर देशानंतर पुन्हा अनुभवल्याचे म्हटले आहे. यातील अनेक आरोपी राजकीय संरक्षणाचा फायदा घेऊन सुटले, परंतु न्याय अखेर मिळतोच, असा विश्वास आणि दिलासाही त्यांनी याचिककर्त्यांना दिला. गेल्या महिन्यात पटियाला कोर्ट हाऊसमध्ये झालेल्या सुनावणीवेळी या चारही आरोपींना साक्षीदाराने ओळखले होते. ‘आमची आई (इंदिरा गांधी) यांचा खून केलाय, म्हणून यांना सोडू नका,’ असे वक्तव्य सज्जनकुमार यांनी केले. त्यानंतर जमावाने 5 जणांना जाळून मारल्याचे साक्षीदाराने सांगितले होते.

पिडीतांना अखेर न्याय : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह

दीर्घ कालावधीनंतर अखेर सामुदायिक हिंसाचारामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी म्हटले आहे. या हिंसाचारामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे आली आहेत. कुमार तथा धर्मदास शास्त्राr, एच. के. एल. भगत, अर्जुनदास अशी अनेकजण आहेत. तथापि या हिंसाचाराबाबत काँग्रेसच्या या कोणत्याही नेत्यांना पक्षाकडून आदेश दिले गेले नव्हते. त्यामुळे ते शिक्षा होण्यास निश्चितच पात्र आहेत. याशिवाय गांधी परिवाराचा या हत्याकांडामध्ये कोणताही सहभाग नव्हता, असेही स्पष्ट केले आहे.

सज्जनकुमार शीखविरोधी हत्याकांडाचे प्रतीक

न्यायालयाने ही शिक्षा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचे स्वागत केले आहे. सज्जनकुमार शीखविरोधी दंगलीचे प्रतिक ठरले आहेत. कमलनाथ हेही एक प्रमुख संशयित आहेत. लवकरच यातील सत्य बाहेर येईल. तथापि त्यांचे मुख्यमंत्री होणे शीख समुदायाकरता जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. काँग्रेसला त्याची फळे भोगावी लागतील, असे जेटली पुढे म्हणाले.

कमलनाथ यांचाही दंगलीत सहभाग : प्रमुख साक्षीदार बीबी जगदीश कौर

आमचे सर्व कुटुंब आणि सैन्यादलामध्ये कार्यरत होते. आमचा दोष काय होता की आम्ही शीख होतो म्हणून आमचे घरदार माणसांसह जाळले. बरे झाले, सज्जनकुमार यांना शिक्षा झाली. शीख हत्याकांडामध्ये कमलनाथ हेही तितकेच दोषी आहेत. शीख समाजाच्या चुकांमुळेच ते मुख्यमंत्री होत आहेत. तर दुसऱया साक्षीदार निरप्रीत कौर यांनीही कमलनाथ मुख्यमंत्री झाले, हा शीखांसाठी काळा दिन असल्याचे म्हटले आहे.