|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाप्रसादाच्या वितरणापूर्वी परवानगी अनिवार्य

महाप्रसादाच्या वितरणापूर्वी परवानगी अनिवार्य 

धर्मादाय खात्याचा आदेश : भाविकांच्या हितासाठी निर्णय

प्रतिनिधी/ बेंगळूर

चामराजनगर जिल्हय़ातील सुळवाडी येथील मारम्मा मंदिराच्या महाप्रसादातून विषबाधा झाल्यामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेकजण अत्यवस्थ झाले होते. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. यापुढे मंदिरांमध्ये महाप्रसाद वितरीत करण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे. धर्मादाय खात्याने याबाबतचा आदेश सोमवारी जारी केला.

चामराजनगर जिल्हय़ाच्या हनूर तालुक्यातील सुळवाडी येथे महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर धर्मादाय खात्याने महाप्रसाद वितरणासाठी अनेक निकष लागू केले आहेत. खात्याच्या अखत्यारित येणाऱया सर्व मंदिरांमध्ये अधिकाऱयांकडून परवानगी घेतल्यानंतरच महाप्रसाद वितरण करता येणार आहे. महाप्रसाद तयार होणाऱया ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱयाची जोडणी करणे सक्तीचे आहे. तसेच वितरणापूर्वी महाप्रसादाची तपासणी करावी. आरोग्य अधिकाऱयांनी परवानगी दिल्यानंतरच प्रसादाचे वितरण करणे अनिवार्य आहे.

महाप्रसादात आढळलेला अंश कीटकनाशकाच

चामराजनगर जिल्हय़ातील किच्चूगुत्ती मारम्मा मंदिरातर्फे वितरीत केलेल्या महाप्रसादात ‘मोनो क्रोटोफोस’ नामक किटकनाशक मिसळण्यात आल्याचे उघड झाले आहे. बेंगळूरच्या विधिविज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी माहिती दक्षिण विभागाचे पोलीस महानिरिक्षक शरतचंद्र यांनी दिली.

अज्ञाताने कीटकनाशक पाण्यामध्ये मिसळले होते. यानंतर या पाण्याचा वापर प्रसाद तयार करताना झाल्याचे विधिविज्ञान प्रयोगशाळेने अहवालात नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास गतीमान झाला असून चौकशीसाठी 13 अधिकाऱयांचे पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

मृतांची संख्या 14 वर

महाप्रसाद सेवनातून विषबाधा झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे. सोमवारी म्हैसूरमधील जे. एस. एस. इस्पितळात उपचाराचा उपयोग न झाल्याने मैलीबाई या महिलेचा मृत्यू झाला. महाप्रसादादिवशी तिने आपल्या पतीसोबत महाप्रसाद सेवन केले होते. त्याच दिवशी तिचा पती कृष्णा नायक याचा मृत्यू झाला होता. तर मैलीबाई अत्यवस्थ झाली होती. तिच्यावर जे. एस. एस. इस्पितळात दाखल करण्यात आले होते.