|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अट्टल चोरटा चंद्रालप्पा गजाआड

अट्टल चोरटा चंद्रालप्पा गजाआड 

प्रतिनिधी /पेडणे :

हनिमूनसाठी गोव्यात आलेल्या मुंबई येथील नवदाम्पत्याच्या मोरजी येथील सुर्लामार हॉटेलच्या रुममध्ये चोरी करून सुमारे 32 लाख रुपयांचे ऐवज लंपास केलेला अट्टल चोर रामचंद्र चंद्रालप्पा (वय 30 वर्षे) राहणारा मूळ तामिळनाडू तसेच त्याचा दुसरा साथीदार प्रकाश एन. ए. (वय 35 वर्षे) राहणारा मूळ आंध्रप्रदेश येथील यांच्या पेडणेवासीयांनी मुसक्या 48 तासांच्या आत आवळल्या.

अटक केलेल्या रामचंद्र चंद्रालप्पा यांनी गुरुवारी (दि. 20) पहाटे 4.30 वा. काणकोण येथील रेल्वे स्थानकाजवळ एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करून तो चोरीच्या दुचाकीवरुन मडगाव रेल्वेस्थानक जवळ राहत असलेल्या ठिकाणी आपल्या भाडेपट्टीवर राहत असलेल्या हॉटेलमध्ये आला असता ताब्यात घेतले. या चोरी प्रकरणातील त्याचा साथीदार प्रकाश एन. ए. याला पेडणे पोलिसांनी बुधवारी दि. 19 रोजी ग्रीनव्हिल हॉटेलमध्ये रात्री 11 वा. पकडले.

पोलीस गाडीतून पळून गेला होता चंद्रालप्पा

यापुर्वी रामचंद्र चंद्रालप्पा याने मोरजी येथील एका हॉटेलमध्ये चोरी करीत असताना हॉटेलच्या कर्मचारी व इतरांनी त्याला पकडून पेडणे पोलिसांच्या स्वाधिन केले होते. मात्र रामचंद्र चंद्रालप्पा हा पोलीस जीपगाडीतून पेडणे स्थानकावर आणत असताना पोलिसांच्या हातावर तुरी ठेऊन पळून गेला होता. तो पळाल्याने पेडणे पोलीस स्थानकाच्या तीन पोलिसांना दि. 6 डिसेंबर 2018 रोजी वरिष्ठ अधिकाऱयांनी हलगर्जीपणासाठी निलंबीत केले होते. यामध्ये अल्ताफ नाईक, रामचंद्र वस्त व जीपचालक विन्सी डायस या तिघांचा समावेश होता.

सुर्लामार हॉटेलमध्ये केली 32 लाखांची चोरी

सुर्लामार हॉटेलमध्ये नवदाम्पत्यांची 32 लाख रुपयांच्या ऐवजांची चोरीही या रामचंद्र चंद्रालप्पा यानेच केली होती. परत गुरुवारी दि. 20 रोजी काणकोण येथे रेल्वेस्थानकाजवळ एका ब्रिटीश महिलेवर झालेला बलात्कारही त्यानेच केला होता.