|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साळ पुनर्वसनवासीयांचे धरणे आंदोलन आमदारांच्या आश्वासनानंतर मागे

साळ पुनर्वसनवासीयांचे धरणे आंदोलन आमदारांच्या आश्वासनानंतर मागे 

प्रतिनिधी/ डिचोली

पुनर्वसन साळ येथील लोकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या गोवा मुक्तीदिनापासून साळ येथे सुरू केलेले धरणे आंदोलन आमदार राजेश पाटणेकर व जलस्रोत खात्याचे अधिक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले. लवकरात लवकर या भागाला जोडणारा रस्ता साकारून ही लोकांची मागणी पुर्ण केली जाणार असून इतर मागण्यांवरही गांभीर्याने लक्ष घातले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर पुनर्वसनवासीयांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.

तिळारी धरण प्रकल्पासाठी ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने आमचे गावचे गाव भुसंपादन केले, त्यावेळी गोव्यातील साळ या गावात गोवा महाराष्ट्र सीमेवर पुनर्वसन करून तेथे सर्व प्रकारच्या मुलभूत सोयींसह सर्व सुविधा प्रदान केल्या जाणार असल्याचे करारात म्हटले होते. मात्र त्यानंतर आज वीस वर्षे झाली, या सरकारने कोणत्याही प्रकारच्या सुविधा येथील पुनर्वसित लोकांना दिलेल्या नाहीत. आमचे पुनर्वसन करण्यासाठी केवळ जागा संपादन करण्यात आली. मात्र त्या जागेतून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्त्याची जागाच या सरकारने संपादन केलेली नसल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही आवश्यक सोयी सुविधा या लोकांना नाहीत.

या आपल्या मागण्यांसाठी पुनर्वसन भागातील लोकांनी साळ येथे धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाला काँग्रेस नेते मेघश्याम राऊत यांनी भेट दिली असता या लोकांच्या मागण्या तत्परतेने मान्य न झाल्यास या विषयावर पणजी येथे आंदोलन केले जाणार असा इशारा देण्यात आला होता.

  लवकरच रस्ता साकारला जाणार आहे.

साळ पंचायत क्षेत्रातील पुनर्वसन या भागात लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकारने जागा संपादन केली होती. पण रस्त्यासाठी आवश्यक जागा संपादन न केल्याने रस्त्याचा विषय लांबणीवर पडला होता. आता मात्र या भागाला जोडणारा रस्ता साकारण्यासाठी जलस्रोत खात्यातर्फे संपादीत केलेल्या जागेचा पर्याय शोधण्यात आला आहे. जलस्रोत खात्याकडून लवकरच ना हरकत दाखला घेऊन तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. व त्यानंतर लगेच विनाविलंब या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा रस्ता सुमारे 200 मीटर लांब तर सुमारे 4 मीटर रूंद अशा पध्दतीने साकारला जाईल, असे यावेळी आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले.

  यावेळी आमदार पाटणेकर यांच्या समवेत जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़?, सरपंच प्रकाश राऊत व इतरांची उपस्थिती होती.

  रस्त्यासह वीज व पाण्याची समस्याही निकाली काढणार.

  रस्ता समस्येसह या भागात पाणी व वीजेचीही समस्या मोठी आहे. रा समस्यांवरही येणाऱया काळात तत्परतेने लक्ष पुरविले जाणार आहे. सध्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सध्या खात्यांतर्गत अभ्यास सुरू आहे. तसेच वीजेची समस्या सोडवून ती सुरळीत करण्यासाठी यापुढे जातीने लक्ष घातले जाणार आहे. या भागाला सरकारी पातळीवर सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी यापुढे उच्च पातळीवर लक्ष घातले जाणार आहे, असेही आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले.