|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओडिशाला 14 हजार कोटींची भेट

ओडिशाला 14 हजार कोटींची भेट 

भुवनेश्वर / वृत्तसंस्था :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिशा येथे 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. मोदींनी अरागुल येथे 1260 कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या आयआयटी-भुवनेश्वरच्या नव्या परिसराच sअनावरण केले आहे. आयआयटी भुवनेश्वर तरुणाईला समर्पित करण्याची संधी मला मिळाली आहे. हे केवळ तरुणाईच्या स्वप्नांचे केंद्र नसून त्यांना रोजगाराच्या संधी वाढविण्यास देखील सहाय्यभूत ठरणार असल्याचे उद्गार मोदींनी यावेळी काढले.

मोदींनी खुर्दानजीकच्या बरुनेई हिल्समधील जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरू न करण्याबद्दल शाब्दिक हल्ला चढविला. ओडिशा राज्य स्वच्छता आणि विकासाच्या प्रकरणी मागे पडत आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजना राबविण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याने गरीबांना उपचारसुविधेच्या लाभापासून मुकावे लागले आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प बंद पडले असून शेतकरी  पाण्यासाठी व्याकुळ झाला आहे. ओडिशात भ्रष्टाचाराचा दानव शक्तिशाली झाल्याचा आरोप मोदींनी सभेत केला.

पाईपलाईन प्रकल्पाचा शुभारंभ

 बेरहामपूर येथे 3800 कोटी रुपयांच्या पारादीप-हैदराबाद पेट्रोलियम उत्पादनांच्या पाईपलाईन प्रकल्पाच्या कार्याचा मोदींनी शुभारंभ केला आहे. महामार्ग रुंदीकरण आणि निर्मितीकार्याचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात ओडिशाचे दोन दौरे करणार आहेत. 5 जानेवारी रोजी मयूरभंजच्या बारीपाडामध्ये एका जाहीरसभेला ते संबोधित करतील. त्यानंतर 16 जानेवारी रोजी ओडिशातील एका बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत.

नाणे, टपाल तिकिटाचे अनावरण

मोदींनी भुवनेश्वरमध्ये पाइका बंडाला 200 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ नाणे तसेच टपाल तिकिटाचे अनावरण केले आहे. 1817 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील हे पहिले शस्त्रांनी केलेले बंड होते. पाइका ही शेतकऱयांची संघटना होती. युद्धाच्या वेळी राजाला सैन्यसेवा उपलब्ध करणारी ही संघटना उर्वरित काळात शेती करायची.