|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नवाझ शरीफना 7 वर्षे कारावास

नवाझ शरीफना 7 वर्षे कारावास 

वृत्तसंस्था /इस्लामाबाद :

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने अल अजीजिया स्टील मिल्सप्रकरणी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये जमवलेल्या काळय़ा धनातून ते सौदी अरेबियामध्ये स्टील मिल्स सुरू करणार होते. त्यांना 25 लाख डॉलर्स (सुमारे 175 कोटी रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे. तर फ्लॅगशीप इन्व्हेस्टमेंट व अन्य एका प्रकरणातून मुक्तता केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती महमद अशरफ मलिक यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

शरीफ यांना याच वर्षी लंडनमधील ऍव्हेनफील्ड येथील चार फ्लॅट खरेदीप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना सप्टेंबरमध्ये जामीन देत शिक्षा रद्दबातल ठरवली होती.

पनामा पेपर्स प्रकरणानंतर नवाज शरीफ यांना सातत्याने आरोप व शिक्षेला सामोरे जावे लागेत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल अकौंटॅबिलिटी ब्युरोने (एनएबी, उत्तरदायित्व न्यायालय) 8 सप्टेंबर 2017 मध्ये शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटला दाखल केला होता. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ यांनी 2001 साली सौदी अरेबियामध्ये अल अजीजिया स्टील मिल्सची स्थापन केली होती. त्याकरिता सौदी सरकारने कर्ज दिल्याचा दावा शरीफ यांनी केला होता. त्याकरिता एक संपत्ती गहाण ठेवली होती. परंतु एनएबीने मात्र त्यांच्यावर पाकिस्तानातून मिळवलेल्या  काळय़ा संपत्तीच्या जोरावर ही मिल स्थापन केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानातून आणलेल्या काळय़ा धनातून सुटका होण्यासाठी हिल मेटल ही बनावट कंपनी स्थापन करुन हा पैसा अधिकृत करून घेतल्याचे सिद्ध केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.