|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुस्लिमांनंतर ख्रिश्चनांना लक्ष्य करतोय चीन

मुस्लिमांनंतर ख्रिश्चनांना लक्ष्य करतोय चीन 

वृत्तसंस्था/ चेंगदू

 जगभरातील कोटय़वधी ख्रिश्चन नाताळ साजरा करत असताना चीनमध्ये ख्रिश्चनांच्या विरोधात गुप्त मोहीम राबविली जात आहे. चीनमध्ये मुस्लिमांनंतर ख्रिश्चनांवर कारवाईची तयारी सुरू आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला चेंगदूचे प्रमुख चर्च बंद करण्यात आले. चीनच्या या कृत्याच्या विरोधात ख्रिश्चन समुदायाने देखील आघाडी उघडली असून लोकांना या मुद्यावर जागरुक करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱयांच्या दडपशाहीमुळे आम्ही आमच्या धर्मापासून मागे हटणार नाही, असा संदेश चर्चच्या काही सदस्यांकडून दिला जातोय. अनेक महिन्यांपासून चीनच्या सर्वात चांगल्या मानल्या जाणाऱया प्रोटेस्टेंट चर्चमध्ये नाताळ साजरा करण्याची प्रतीक्षा ख्रिश्चनधर्मीय करत होते, परंतु डिसेंबरच्या प्रारंभीच पोलिसांनी संबंधित प्रार्थनास्थळ बंद पाडले आहे. चेंगदूच्या अर्ली रेन चर्चला टाळे ठोकण्यात आले असून ख्रिश्चन कार्यकर्ते चीन प्रशासनाच्या या कृतीला ख्रिश्चन समुदायावरील मागील एक दशकातील सर्वात मोठा हल्ला ठरवत आहेत.

पोलिसांनी बायबल देखील जप्त केले असून चर्चकडून चालविल्या जाणाऱया शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. तोडफोडीसाठी चिथावणी देण्याच्या आरोपांतर्गत अर्ली रेनच्या पाद्रय़ाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांना किमान 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

चीनच्या सरकारने यंदा बायबलच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच देशातील अनेक चर्चेस जमीनदोस्त करत कित्येक प्रार्थनास्थळे बंद पाडली आहेत. ख्रिश्चन धर्म चीनमध्ये सर्वाधिक वेगाने वाढत असल्याने कम्युनिस्ट नेतृत्वाने हे पाऊल उचलले आहे.