|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शालेय पोषण आहाराचा तांदूळ उघडय़ावर

शालेय पोषण आहाराचा तांदूळ उघडय़ावर 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया शालेय पोषण आहाराची तब्बल 1400 टन तांदळाची पोती मार्केट यार्ड परिसरातील बाबा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाबाहेर ठेवल्याचा प्रकार मंगळवारी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या ठिकाणी छापा आंदोलन करुन उडवाउडवीची उत्तरे देणाऱया येथील ठेकेदाराच्या कर्मचाऱयाला कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. हा तांदूळ ऍल्युमिनियम औद्योगिक कंपनीच्या शेजारीच असल्यामुळे यामधून बाहेर पडणाऱया सल्फाईड ऍसिडमुळे विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका असल्याचे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

दुपारी साडे बाराच्या सुमारास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गोदामाच्या ठिकाणी छापा आंदोलन केले. या ठिकाणी तांदळाची पोती उघडय़ावर  दिसून आली. याबाबत कार्यकर्त्यांनी येथील व्यवस्थापनासाठी असलेला कर्मचारी रजनीकांत बुलबुले यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सचिन तोडकर व कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला. दरम्यान बाबा ट्रेडिंग कंपनी ही लातूरची असून त्यांच्याकडे जिह्यातील शालेय पोषण आहाराचा ठेका आहे. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा तांदूळ घेऊन तो जिल्हा परिषदेच्या जिह्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांना पुरविला जातो. अशा प्रकारे उघडय़ावर तांदूळ ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीष घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी आशा उबाळे व ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.