|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बाललैंगिक अत्याचाऱयांना फाशी

बाललैंगिक अत्याचाऱयांना फाशी 

नराधमांना कठोर शिक्षेची तरतूद : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

12 वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमांवर कठोर कारवाई करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात बदल करून नराधमांना फाशीची कठोर शिक्षा देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली होती. या पार्श्वभूमीवर  शुक्रवारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को ऍक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यापूर्वी राजस्थान व मध्य प्रदेश सरकारने 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कायदा मंजूर केला होता. या कायद्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने कायद्यात बदल केल्यामुळे लहान मुलांचा छळ करणाऱयांना अद्दल घडेल आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होईल असा दावा केला जात आहे.