|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नंदनवनात हिमकणांची चादर

नंदनवनात हिमकणांची चादर 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर सध्या गारठले व गोठले असून येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. या वर्षीच्या थंडीच्या हंगामात हिमकणांची मौज दुसऱयांदा पहावयास मिळाली. या पूर्वी 11 डिसेंबर रोजी असेच हिमकण पहिल्यांदा दृष्टीस पडले होते. दरम्यान, नविन वर्षाच्या स्वागतासाठी  पर्यटननगरी सज्ज झाली असून त्याची मौज लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे. त्यामुळे वेण्णा तलाव परिसरात ठिकठिकाणी हिमकणांची दुलाई स्थानिकांसह पर्यटकांना पहावयास मिळाल्याने त्यांच्यात अनोखा उत्साह व आनंद पहावयास मिळाला.

    हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे शुक्रवारी महाबळेश्वर शहर परिसरातील निचांकी तापमान 9.6 अंश डिग्री सेल्सियर्स होते तर वेण्णा तलाव परिसरात ते जाणकारांच्या माहिती प्रमाणे 2 अंश ते 3 अंश इतके निचांकी असावे. दरम्यान, गुरुवार रात्रीपासून अचानक थंडीचा जोर वाढला. पहाटे तर तो आणखीनच वाढला. यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमळा पर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरात ठिकठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे दिसून येत होते. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावावरील बोटीमध्ये चढण्यासाठी वापरल्या जाणाऱया जेटीवर हिमकण ठिकठिकाणी जमल्याने तो भाग पांढरा झाल्याचे दिसत होते तर याच परिसरातील वाहनांच्या टपांवरही हिमकणांची चादर टाकल्याचे मनमोहक दृश्य दिसत होते. येथील हिमकण जमा करण्याचा आनंद सकाळी स्थानिकांसह पर्यटकांनी मनमुरादपणे लुटला तर याच परिसरातील स्ट्रॉबेरी फळांच्या बागा तसेच स्मृतीवन पठार हिमकाणामुळे पांढरे शुभ्र झाल्याचे तसेच तेथील वेला झाडे, झुडपे ही हिमकणाने गुरफटल्यामुळे पांढरे झाले होते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा यावर्षी दुसऱयांदा पाहिला मिळाल्याने तसेच नविन वर्षाच्या स्वागतादरम्यानच पहावयास मिळाल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्यात वेगळा उत्साह बघायास मिळत आहे.

Related posts: