|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पर्यटकांची वेण्णा तलाव परिसरात प्रचंड गर्दी

पर्यटकांची वेण्णा तलाव परिसरात प्रचंड गर्दी 

प्रतिनिधी/  महाबळेश्वर

निसर्गाची जादूनगरी असलेल्या महाबळेश्वरमध्ये या वर्षी प्रथमच सलग तीन दिवस हिमकण पहावयास मिळत असून एकाच वेळी सलग तिसऱया दिवशी हिमकण दिसल्याची दुर्मिळ घटना असल्याने ते पाहण्यासाठी रविवारी भल्या सकाळीच पर्यटकांसह स्थानिकांनी येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात एकच गर्दी केली होती. त्यामुळे भल्या सकाळचे वेण्णा तलावावरील गर्दीचे दृश्य पाहिल्यावर नौकाविहारासाठीची नेहमी दिसणारी दुपारची तर गर्दी नाही ना अशी शंका
पाहणाऱयाला येत होती.

   दरम्यान, या वर्षी थंडीच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू गोठून हिमकण दिसण्याची आजची ही चौथी वेळ असून सलग तीन दिवस हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी 11 डिसेंबर रोजी प्रथम हिमकण तयार झाले होते. तर 28, 29 व 30 डिसेंबरला पुन्हा सलग हिमकण दिसल्याने त्याचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांना मोठय़ा प्रमाणात घेता आला. आजपर्यंतची हिमकण तयार झाल्याची नोंद पाहता सलग हिमकण तयार होण्याचा विक्रम बऱयाच वर्षांनंतर या वर्षी प्रथमच आला आहे, असे जाणकारांचे मत आहे. गेले चार दिवस या गिरीशिखरावर प्रचंड थंडी होती. आजही येथील थंडीचा जोर कायम आहे. या सलगच्या सतत वाढत्या थंडीमुळे शहरात सुमारे 9 इतके नीचांकी तापमान तर वेण्णा तलाव परिसरात ते 2 अंश सेल्सिअस इतके नीचांकी होते यामुळे गेले तीन दिवस सतत वेण्णा तलाव परिसरात दवबिंदू गोठून त्याचे हिमकण झाल्याचे सुखद चित्र दिसत होते. वेण्णा तलावावरील जे टी, याच परिसरातील वाहनाचे टप, स्मृतीवनातील वेली, रानफुले, झाडे झुडुपे, गवताचे पठार सर्वत्रच हिमकणांमुळे पांढरा शुभ्र भाग झाल्याचे पहावयास मिळत होते. संधी मिळेल तेथे त्याचा आनंद पर्यटक मोठय़ा संख्येने घेताना दिसत होते. या वर्षी सलग हिमकणाची मौज ऐन नविन वर्षाच्या स्वागताच्या दरम्यानच मिळाल्याने या गिरीशिखरावर वेगळाच माहोल व उत्साह दिसत आहे. नविन वर्षाच्या स्वागतासाठी ही नगरी सज्ज झाली असून येथील निसर्गही नटला आहे. येणारे पर्यटकही वाढत आहेत. महाबळेश्वरमध्ये या वर्षी ही दुर्मिळ संधी सर्वांसाठी असल्याने पर्यटकांसह सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात व जल्लोषात करीत असतानाच निसर्गाच्या या दुर्मिळ संधीचा आनंद मुक्तपणे लुटावा………….