|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ऊश्री सेवागिरी महाराज की जय च्या जयघोषात पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

ऊश्री सेवागिरी महाराज की जय च्या जयघोषात पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ 

वार्ताहर/पुसेगाव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया पुसेगाव (ता. खटाव) येथील ब्रह्मलीन तपोनिधी सिध्दहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंडय़ाच्या भव्य मिरवणुकीने श्री सेवागिरी महाराज की जय च्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठय़ा भक्तिमय व उत्साही वातावरणात झाली.

     रविवार 30 डिसेंबर ते 9 जानेवारी या कालावधीत येथील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात व सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. या यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसासह इतर राज्यांतून 10 ते 12 लाख भाविक मोठय़ा संख्येने येतात. याही वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

      श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, यांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, सरपंच हेमा गोरे, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव, उपसरपंच प्रकाश जाधव तसेच शामराव जाधव, लक्ष्मण जाधव, माजी उपसरपंच बाळासाहेब जाधव, प्रदिप जाधव, विलासकाका जाधव, दिलीप जाधव, शिवाजीराव जाधव, जगनशेठ जाधव, गुलाबराव वाघ, एम. आ. जाधव, बापू जाधव, सुरेश पाटील, दिलीप बाचल, प्रविण जाधव, चंद्रकांत जाधव, अरूण जाधव, सुरेश जाधव, संदीप जाधव, अंकुश पाटील, सुसेन जाधव, संजय क्षीरसागर, रमेश देवकर, रघुनाथ दळवी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ, भाविक, मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थितीत होते.

   सकाळी 9 वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंडय़ाचे व पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. भाविक-भक्त व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. 

    मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री सेवागिरी विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला,  राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, सेवागिरी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचे आकर्षक वेशभूषेतील झांज व लेझीमपथके सहभागी झाली होती.

   शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात सादर केलेले विविध कलाविष्कार  या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करुन लेझीम, कार्यक्रम लक्षवेधक ठरवला.

    मिरवणुकीनंतर मानाच्या झेंडय़ाची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी चोख बंदोबस्त व  वाहतूक व्यवस्थेत उत्कृष्ट बदल केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.

  दरम्यान, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत वेब पेजचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त व ग्रामस्थ, भाविक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

  देवस्थान ट्रस्टच्यावतीने यावर्षी प्रथमच सहभागी शाळा व महाविद्यालयाला पर्यावरण रक्षण, बेटी बचाओ, ग्रामस्वच्छता, ग्रंथालये – काळाची गरज अशा समाजप्रबोधनात्मक विषयाचे फलक आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार यावर्षीच्या पालखी व झेंडा मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले सूचना फलक भाविक व नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते…………..