|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » प्रेमाची भाषाच निराळी

प्रेमाची भाषाच निराळी 

उद्धवांना काय माहीत की श्रीकृष्ण आणि गोपी तर एकच आहेत. ते पत्र लिहिण्याचा आग्रह करतात. ज्ञानी पुरुष भक्तहृदयातील गोष्टी समजत नाहीत. उद्धव प्रेमाचे रहस्य जाणतच नव्हते. भगवान म्हणाले-उद्धवा! पत्र लिहायचा मी पुष्कळ वेळा प्रयत्न केला, परंतु लिहिताच आले नाही. लिहू तर काय लिहू? मी आपल्या आईला एका पत्राच्या तुकडय़ाने कसा धीर देऊ? ती तर मला पाहून, छातीला लाऊन, खाऊपिऊ घालूनच शांत आणि संतुष्ट होऊ शकेल.

श्रीकृष्णांनी कित्येक वेळा यशोदामातेला पत्र लिहिण्याचे मनोमन ठरवले. परंतु पत्र वाचून आई आणखी आठवण काढून दु:खी होईल असा विचार करून ते थांबून जात. एक तर हा इकडे येत नाही आणि पत्र पाठवून आणखी दु:खी करीत आहे. कृष्ण पत्रात यशोदामय्या हा शब्द लिहून थांबून जात. पुढे काही लिहू लागलं तर डोळय़ांतून अश्रू वाहू लागत. प्रेमाची भाषाच निराळी आहे. प्रेमभाषा शब्दांच्या सीमेपलीकडे आहे. खरे प्रेम तर हृदयाचे हृदयच ऐकू शकते. पत्राद्वारे पाठविले जाऊ शकत नाही.भगवान उद्धवाला म्हणतात-उद्धवा! मला हे समजत नाही की मी काय आणि कसे लिहू? म्हणून तूं वृंदावनात जाऊन गोपींना ब्रह्मज्ञान देऊन त्यांना समजून उमजून माझा विसर पडेल असे कर. नंदबाबा आणि यशोदामय्या यांचेपण सांत्वन कर.

उद्धव समजले की ते ज्ञानी आहेत म्हणून त्यांना व्रजांत पाठविले जात आहे. ते ज्ञानी तर होतेच, पण त्याबरोबर अभिमानी पण होते. ते म्हणतात-महाराज! मला तेथे जायला अडचण तर काही नाही. परंतु गावातील न शिकलेले अडाणी लोक माझ्या वेदान्ताचे ज्ञान कसे समजू शकतील? माझ्या तत्त्वज्ञानाचा उपदेश फार गहन आहे म्हणून माझे तेथे जाणे निरर्थक आहे. हे भाषण उद्धवांचे नसून उद्धवांच्या ज्ञानाच्या अभिमानाचे आहे. त्यांना अभिमान होता की ते बृहस्पतीचे शिष्य आहेत आणि वेदान्ताचे आचार्य आहेत. गोपींना न शिकलेल्या, अडाणी म्हटलेले श्रीकृष्णांना ऐकवले नाही. त्यांनी उद्धवांना म्हटले-माझ्या गोपी शिकलेल्या नाहीत, त्या तर ज्ञानाच्याही पार आहेत. त्या जास्त शिकलेल्या नसल्या तरी शुद्ध प्रेमाच्या ज्ञात्या आहेत. याच कारणाने तर त्या माझी प्राप्ती करू शकल्या आहेत. आणखी काय सांगू? गोपींचे मन निरंतर माझ्याचकडे लागलेले आहे. त्यांचे प्राण आणि जीवन मीच आहे. माझ्याचसाठी तर त्यांनी आपले पति, संतान, नातेवाईक यांचा त्याग केला आहे. त्या मला आपला आत्मा समजतात. उद्धवा! माझ्या गोपी शिकलेल्या नसूनही प्रेमाच्या मूर्ति आहेत. स्नेहाच्या ज्योती आहेत. प्रेमाची रीत त्यांना चांगली अवगत आहे. उद्धवा! माझ्या गोपींना ज्ञानाची आवश्यकता आहे आणि तुला प्रेमाची, भक्तीची. म्हणून तुला तेथे जावेच लागेल. निव्वळ ज्ञानानेच किंवा निव्वळ भक्तीनेच मनुष्य पूर्ण होत नाही. आयुष्यात ज्ञान आणि भक्ती दोहोंचा समन्वय करून प्रेममय जीवन जगून प्रभूची प्राप्ती करायची आहे.

Ad.देवदत्त परुळेकर