|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बसवेश्वर सर्कल बनत आहे धोकादायक

बसवेश्वर सर्कल बनत आहे धोकादायक 

बेळगाव / प्रतिनिधी

येथील बसवेश्वर उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर या पुलावरून रहदारीत वाढ झाली आहे. याचा परिणाम बसवेश्वर सर्कल, गोवावेस या ठिकाणी होत असून या चौकातील वाहतूक धोकादायक बनली आहे. बसवेश्वर सर्कलमध्ये रहदारी पोलिसांची नियुक्ती केली नसल्याने तसेच या ठिकाणी गतिरोधक किंवा सिग्नल व्यवस्था नसल्याने हा चौक वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनला आहे. या चौकात 7 ते 8 रस्ते मिळत असल्याने नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. यासाठी या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती तसेच सिग्नल व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

बसवेश्वर चौकात महात्मा फुले रोड, शहापूर-गोवावेस रस्ता, आरपीडी क्रॉसपासून गोवावेसकडे येणारा रस्ता तसेच कलामंदिरकडून गोवावेसकडे येणारा रस्ता जोडतो. यामुळे या चौकात चारीही बाजूंनी नेहमीच वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. यामध्ये अवजड वाहनांची ये-जाही असते. मात्र, या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती नसल्याने चौकात वारंवार वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघातास निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असते. यापूर्वीही या चौकात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. तरीही प्रशासनाकडून याची दखल घेतली नाही. आठवडय़ापूर्वी बसवेश्वर उड्डाणपुलावरून वाहतुकीस सुरुवात केली आहे. यामुळे हा चौक पुन्हा वाहतुकीच्या वर्दळीने गजबजू लागला आहे.

या चौकात नेहमीच वाहनांची ये-जा सुरू असते. सर्वच वाहनचालकांना आपली वाहने पुढे दामटण्याची घाई असते. यातून अपघाताची शक्मयता अधिक आहे. या चौकात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी रहदारी पोलिसांची नियुक्ती आवश्यक बनली आहे. शिवाय सिग्नलची व्यवस्था करणेही गरजेचे बनले आहे.  

 

 

Related posts: