|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » हंटर्सचा नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सवर विजय,

हंटर्सचा नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सवर विजय, 

पीबीएल 4 : सिंधूची सायना नेहवालवर मात

वृत्तसंस्था/ पुणे

पीव्ही सिंधूने नव्या वर्षाची सुरुवात विजयाने केली असून तिने सायना नेहवालचा पराभव केला. सिंधू व मार्क कॅल्यू यांच्या विजयाच्या बळावर हैदराबाद हंटर्सने पीबीएल 4 मधील तिसरा विजय नोंदवताना नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सचा पराभव केला.

पुणे टप्प्यातील त्यांची ही शेवटची लढत होती आणि या टप्प्यात अग्रस्थान मिळविले. उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. पण शौकिनांचे आकर्षण ठरले ते भारताच्या दोन ‘शटल क्वीन्स’ सिंधू व सायना यांच्यातील लढत. सिंधूला पीबीएलमधील याआधीच्या लढतीत सुंग जि हय़ुन व बीवेन झँग यांच्याकडून पराभूत झाली होती. पण यावेळी तिने सायनावर 11-15, 15-9, 15-5 अशी मात केली. सायना आधीच्या तीन लढतीत दुखापतीमुळे खेळली नव्हती. ती अजून पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे दिसून आले. दीर्घ रॅलीज खेळताना तिची दमछाक होत होती. अशा स्थितीतही तिने पहिला गेम जिंकला होता. पण नंतरच्या दोन गेम्समध्ये सिंधूने बाजी मारली.

दुसऱया पुरुष एकेरीत मार्क कॅल्यूने हौवेईचा 15-11, 15-14 असा पराभव केला. मार्क हा यावेळचा आतापर्यंत अपराजित खेळाडू आहे. त्याआधी अनुभवी ली हय़ुन इलने संघर्षपूर्ण लढतीत एस. टॅनाँगसॅकवर 10-15, 15-13, 15-9 असा विजय मिळविला. हंटर्सचा हा ट्रम्प सामना असल्याने लढतीतील आव्हान जिवंत राहण्यास हा विजय उपयुक्त ठरला. मिश्र दुहेरीचा सामना गमविल्याने प्रारंभी हैदराबाद हंटर्स पिछाडीवर पडले होते. सिंधूने आपला सामना जिंकून लढतीतील हंटर्सचा विजय निश्चित केला.