|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » खरी माणुसकी ! रिक्षावाल्याने परत केले प्रवाशाचे 3.8 लाख रूपये

खरी माणुसकी ! रिक्षावाल्याने परत केले प्रवाशाचे 3.8 लाख रूपये 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

चालत्या रिक्षातून बॅगा हिसकावण्याचे प्रकार नवे नाहीत. पण, रिक्षात चुकून राहिलेली लाखो रुपयांनी भरलेली बॅग प्रवाशाला परत मिळण्याच्या घटना तशा दुर्मिळच. अशीच एक घटना चेन्नईत घडली आहे. तब्बल ३.८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग रिक्षाचालकाने प्रवाशाला परत केली आहे.

 

पार्थिबन असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तुतिकोरिन येथील मोहम्मद अझरुद्दीन याने बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रासोबत चिन्मयनगर येथून रिक्षा पकडली. तो कोयाम्बेदू येथील रोहिणी थिएटरजवळ उतरला. पण उतरताना त्याची लॅपटॉप बॅग रिक्षातच विसरला. अझरुद्दीनला सोडून बरंच अंतर कापल्यानंतर रिक्षाच्या मागच्या सीटवर बॅग राहिल्याचे पार्थिबनच्या लक्षात आले. त्याने ती बॅग उघडली तर त्यात रोख पैसे दिसले. त्याने लगेचच रिक्षा फिरवून प्रवाशाचा शोध घेतला. मात्र, संबंधित व्यक्ती न सापडल्याने त्याने बॅग घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली. त्या दरम्यान अझरुद्दीनही बॅग हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. सर्व शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी बॅग त्याला परत केली. अझरुद्दीने रिक्षाचालकाचे आभार मानून त्याला प्रामाणिकपणाबद्दल बक्षीसही दिले. चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी त्याचा सत्कार केला.