|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » सात मराठी चित्रपटांची ‘पिफ’मध्ये निवड

सात मराठी चित्रपटांची ‘पिफ’मध्ये निवड 

 

 

‡ पुणे / प्रतिनिधी:

पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया 17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदाच्या वर्षी सात चित्रपट निवडले गेले असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘मुळशी पॅटर्न’, ‘नाळ’, ‘खटला बिटला’, ‘भोंगा’, ‘चुंबक’, ‘बोधी’, ‘दिठी’ या सात मराठी चित्रपटांचा समावेश असणार आहे. गोन्जालो जस्टिनिऍनो दिग्दर्शित ‘डॅम किड्स’ हा स्पॅनिश चित्रपट ‘पिफ’ची ओपनिंग फिल्म असणार आहे. त्याबरोबरच ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘ट्रिब्युट’, ‘कंट्री फोकस’, ‘विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग’या अंतर्गत निवडलेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

‘रेट्रोस्पेक्टिव्ह’मध्ये ‘अमर’, ‘अंदाज’, ‘मदर इंडिया’, ‘द लास्ट एम्परर’, ‘लिटील बुद्धा’ आणि ‘लास्ट टॅन्गो’ यांचा समावेश आहे. ‘ट्रिब्युट’ या विभागात ‘इंग्लिश-विंग्लिश’, ‘रुदाली’ आणि ‘टू लिव्ह’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘कंट्री फोकस’ या विभागात हंगेरीचे 4, अर्जेंटिनाचे 6, तर टर्कीमधील 3 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘विद्यार्थी स्पर्धात्मक विभागा’मध्ये लिथुनिया, अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड आणि मॅक्सिको या पाच देशातील सहा चित्रपट, तर ऍनिमेशन विभागात अमेरिका, इटली, झेक रिपब्लिक, इंग्लंड, भारत, स्लोव्हाकिया, फ्रान्स, स्वीडन, ब्राझील, रशिया या दहा देशांमधून 16 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

पिफमध्ये चित्रपट पाहण्याबरोबरच पिफ फोरममध्ये चित्रपटांशी संबंधित मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून चित्रपटांची विविध अंगांनी माहिती या ठिकाणी मिळणार आहे. ‘विजय तेंडुलकर स्मृती व्याखाना’मध्ये प्रसिद्ध पटकथालेखक कमलेश पांडे यांचे व्याख्यान होणार आहे.