|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कॅन्सरशी लढणाऱया सर्जाचे अखेर निधन

कॅन्सरशी लढणाऱया सर्जाचे अखेर निधन 

वार्ताहर / मालवण:

येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कला शाखेचा विद्यार्थी सर्जा खरात या 22 वर्षीय गुणवंत विद्यार्थ्याची कॅन्सरशी झुंज अखेर निष्फळ ठरली. त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्याची प्ढ्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. त्यामुळे त्याला दोनच दिवसांपूर्वी त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. अखेर शुक्रवारी सकाळी त्याचे निधन झाले.

सर्जा हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी. देऊळवाडा परिसरात झोपडीत त्याचे कुटुंब मोलमजुरी करून राहते. वडिलांच्या पश्चात आईने मुलांचा सांभाळ केला. कॉलेजमध्ये हुशार, होतकरू, प्रामाणिक, शिस्तबद्ध व प्रत्येक उपक्रमात पुढे असणारा उत्साही, गुणवंत विद्यार्थी म्हणून तो परिचीत होता. उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणूनही त्याची ओळख होती. चांगले वर्तन, मनमिळावू आणि सगळय़ा कामात मदत करण्याच्या स्वभावामुळे शिक्षकांसह विद्यार्थी व मित्रपरिवाराचाही सर्जा  लाडका होता. 

सर्जाच्या आतडय़ात गाठी झाल्या होत्या. त्याची दोन ऑपरेशन्स झाली होती. या होतकरू विद्यार्थ्याला ऐन तारुण्यात गंभीर आजाराने ग्रासल्याने शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार अशा सर्वांनाच धक्का बसला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी येणारा लाखेंचा खर्च कसा करायचा, हा यक्ष प्रश्न त्याच्या कुटुंबियांसमोर उभा होता. स. का. पाटील विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मदतफेरी काढून सर्जासाठी लाखाची मदत गोळा केली होती. तसेच देऊळवाडा मित्रमंडळाने 1 लाख 22 हजाराची मदत केली होती. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related posts: