|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात फलकबाजी करणाऱया 18जणांवर गुन्हे

चिपळुणात फलकबाजी करणाऱया 18जणांवर गुन्हे 

-नगर परिषदेने दिली तक्रार

-न्यायालयाच्या फलकावर फलक लावणे पडले महाग

@ चिपळूण / प्रतिनिधी

ठिकठिकाणी फलक लावून उच्च न्यायालयाचे आदेश मोडून शहराचे विदुपीकरण करणाऱया येथील 18जणांवर शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राजकारण्यांचा समावेश आहे. असा गुन्हा दाखल झाल्याचा हा जिल्हय़ातील पहिलाच प्रकार असून या बाबतची तक्रार नगर परिषदेने दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या फलकावर फलक लावणे अनेकांना महाग पडणार आहे.

शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने मुख्य ठिकाणी फलक लावण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही आजही शहरात महत्वाच्या ठिकाणी हे फलक झळकताना दिसतात. ते जप्त करण्याची कारवाई नगर परिषद अधूनमधून करते, असे असतानाच गुरूवारी न्यायालयाच्या फलकाजवळच राजकारण्यांचा फलक लावण्यात आला होता. हा प्रकार न्यायाधिशांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुख्याधिकाऱयांना न्यायालयात बोलावून घेत असे फलक लावणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नगर अभियंता राजेंद्र मयेकर यांनी शहरातील पॉवरहाऊस, डीबीजे कॉलेज परिसर, बहाद्दूरशेखनाका, न्यायालय परिसर या ठिकाणी लावलेल्या फलकांची फोटोग्राफी करत ते काढून घेतले. या फलकांवर नावे असलेल्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, महिला भाजपच्या राज्य कार्यकर्त्या निलम गोंधळी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल, नगरसेवक विजय चितळे, रामदास राणे, अमोल भोबस्कर, दत्ता मिरगल, डीबीजे महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य मानकर, अशोक विचारे, एन. एस. कासार, अरविंद थरवळ, वंदना मोरे, राम शिंदे, वैशाली मुखर यांच्याविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने गुन्हा दाखल झालेली जिल्हय़ातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. 

पोलीस करणार सखोल तपास

वरील 18जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांची फलकांवर नावे आहेत  म्हणून झाले आहेत. मात्र हे फलक नेमके कुणी तयार केले, कुणी लावले याचा पोलीस शोध घेणार आहेत. त्यामुळे कदाचित गुन्हा दाखल झालेल्यांची नावे कमी होऊ शकतात किंवा लावणाऱयांचा शोध लागल्यास ती वाढूही शकतात.

Related posts: