|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » नयनतारा सहगलांचे महाराष्ट्राशी नाते; मनसेचा विरोध मावळला

नयनतारा सहगलांचे महाराष्ट्राशी नाते; मनसेचा विरोध मावळला 

 

 

पुणे / प्रतिनिधी:

मराठीच्या मुद्दय़ावर यवतमाळ येथे होणाऱया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनसेकडून झालेला विरोध आता मावळला आहे. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे त्यांना आमचा विरोध नाही, असे मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असेल, तर त्याला आपला विरोध राहील, अशी भूमिका घेऊन संमेलन उधळून लावण्याचा इशारा मनसेकडून घेण्यात आला होता. मात्र, पक्ष प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सहगल यांच्या नावाला असा कोणताही विरोध नसल्याचे म्हटले आहे. नयनतारा सहगल यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांना विरोध नाही. साहित्य संमेलनात मराठीचा सन्मान राखला जावा, इतकीच आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

नयनतारा सहगल या इंग्रजी साहित्यिका असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शेतकरी न्याय हक्क समितीसह काहींनी त्यांना विरोध दर्शविला होता. मात्र, सहगल या बॅ. रणजित पंडित व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या असून, त्यांचे आजोबा शंकर पंडित यांचे मराठी, संस्कृत, इंग्रजी, जर्मन या भाषांवर प्रभुत्व होते. सहगल या महाराष्ट्रकन्याच असून, महाराष्ट्र हे त्यांचे माहेर आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा, अशी भूमिका अनेक साहित्यिक व साहित्य संस्थांकडून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधातील विरोध मावळत असल्याचे दिसत आहे.