|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पाकवर 9 गडी राखून विजय

दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पाकवर 9 गडी राखून विजय 

तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी, वेगवान गोलंदाज डेल स्टीनचे सामन्यात 7 बळी

वृत्तसंस्था/ केपटाऊन

येथे झालेल्या दुसऱया कसोटीतही यजमान दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकने विजयासाठी दिलेले 41 धावांचे लक्ष्य आफ्रिकेने 9.5 षटकांत एका गडय़ाच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टीनने जोरदार कमबॅक करताना सामन्यात 7 बळी घेतले. डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी दि. 11 पासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येईल.

प्रारंभी, पाकिस्तानचा डाव 177 धावांत आटोपल्यानंतर द.आफ्रिकेने पहिल्या डावात 431 धावा केल्या होत्या. दुसऱया डावात दमदार सुरुवातीनंतरही मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पाकचा दुसरा डाव 70.4 षटकांत 294 धावांवर आटोपला व यजमान संघाला अवघे 41 धावांचे विजयी लक्ष्य मिळाले. पाककडून दुसऱया डावात शान मसूद (61), असद शफीक (88) व बाबर आझम (72) यांनी अर्धशतके झळकावली पण इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. आफ्रिकेकडून डेल स्टीन व रबाडा यांनी प्रत्येकी 4 बळी घेत पाकच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

पाकने विजयासाठी दिलेले 41 धावांचे लक्ष्य आफ्रिकेने सहज पार करत दुसरा कसोटी सामनाही जिंकला. प्रारंभी, डी ब्रुन (4) झटपट बाद झाला. मात्र, डीन एल्गारने नाबाद 24 धावांची खेळी साकारत संघाला विजय प्राप्त करुन दिला. डु प्लेसिस 3 धावांवर नाबाद राहिला. या मालिकेतील सेंच्युरियन येथे झालेला पहिला सामना यजमान संघाने 6 गडय़ांनी जिंकला होता.

संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 177 व 294, दक्षिण आफ्रिका प.डाव 431 व दु.डाव 9.5 षटकांत 1 बाद 43.

Related posts: