|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण 21 रोजी सिंधुदुर्गच्या दौऱयावर

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण 21 रोजी सिंधुदुर्गच्या दौऱयावर 

वार्ताहर / सावंतवाडी:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 21 व 22 जानेवारी रोजी कोकण दौऱयावर येत आहेत. 21 रोजी ते सिंधुदुर्गात येणार आहेत. कोकणात काँग्रेस पक्षाला उभारी देण्याच्यादृष्टीने चव्हाण यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, भाई जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जागा वाटपानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री भास्कर जाधव यांचे नाव पुढे आले आहे. परंतु ही जागा काँग्रेसकडेच राहणार आहे. रायगड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कोकणच्या दौऱयावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण प्रथमच कोकण दौऱयावर येत आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

21 रोजी सावंतवाडीत काँग्रेसचा मेळावा होणार आहे. 22 रोजी ते रत्नागिरी जिल्हय़ाचा दौरा करणार आहेत, असे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी स्पष्ट केले.